Indian Railway: देशातील मोठी लोकसंख्या प्रवासासाठी भारतीय रेल्वेची सुविधा वापरते. शहरांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने रेल्वेवर मोठा ताण पडू लागला आहे. पण आता रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेमध्ये विकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. देशात अनेक किलोमीटरचे नवीन रेल्वे रुळ टाकण्यात येत आहेत. अनेक नवीन गाड्या सुरू झाल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेससारख्या जगप्रसिद्ध गाड्याही या काही वर्षांत रुळांवर धावल्या आहेत. आता पुढील पाच वर्षांत आणखी हजारो गाड्या चालवण्याचा रेल्वेचा विचार आहे. या योजनेनुसार पुढील पाच वर्षांत तीन हजारहून अधिक गाड्या चालवण्याचा रेल्वेचा विचार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
3 हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर रेल्वे काम करत आहे. रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या चार-पाच वर्षांत तीन हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर काम करत असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली.
प्रवासाचा वेळ कमी करणे हे त्यांच्या मंत्रालयाचे आणखी एक महत्त्वाचे लक्ष्य असल्याचे वैष्णव म्हणाले. सध्या वर्षाला सुमारे 800 कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. वाढती लोकसंख्या विचारात घेता 4 ते 5 वर्षांत ही क्षमता 1 हजार कोटींपर्यंत वाढवावी लागेल, असेही ते म्हणाले.
रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या संख्येसाठी 3 हजार जादा गाड्यांची गरज आहे, ज्यामुळे प्रवाशांची ही वाढलेली संख्या सुलभ होण्यास मदत होणार आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 69 हजार नवे डबे उपलब्ध असून दरवर्षी रेल्वे सुमारे पाच हजार नवीन डबे बनवत आहे.या सर्व प्रयत्नांमुळे रेल्वे दरवर्षी 200 ते 250 नवीन गाड्या आणू शकते. जे 400 ते 450 वंदे भारत गाड्यांव्यतिरिक्त आहे. येत्या काही वर्षांत या गाड्या रेल्वेत सामील होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. प्रवासाचा वेळ कमी करणे हे रेल्वेचे आणखी एक लक्ष्य आहे, ज्यासाठी मंत्रालय ट्रेनचा वेग सुधारण्यासाठी आणि रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी काम करत असल्याचे रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले.
वैष्णव म्हणाले की, रेल्वेची क्षमता आणखी वाढवण्यासाठी दरवर्षी सुमारे पाच हजार किलोमीटरचे ट्रॅक टाकले जात आहेत. तसेच 1 हजाराहून अधिक उड्डाणपूल आणि अंडरपासही मंजूर झाले असून अनेक ठिकाणी काम सुरू झाले आहे. गेल्या वर्षी आम्ही 1,002 उड्डाणपूल आणि अंडरपास बांधले आणि यावर्षी ही संख्या 1,200 पर्यंत वाढवण्याचे आमचे ध्येय असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणाले.