'भाजपशी आम्ही आघाडी करू म्हणणे हा मोठा विनोदच'

काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात आघाडीसाठी भाजपने सर्व पर्याय खुले ठेवल्याचे म्हटले होते.

Updated: Jan 18, 2019, 01:04 PM IST
'भाजपशी आम्ही आघाडी करू म्हणणे हा मोठा विनोदच' title=

चेन्नई - काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात आघाडीसाठी भाजपने सर्व पर्याय खुले ठेवल्याचे म्हटले होते. पण त्यांच्या या वक्तव्याची एआयएडीएमकेने खिल्ली उडवली आहे. भाजपला आम्ही आमच्या पाठीवर घेऊ असे म्हणणे हा मोठा विनोदच आहे. त्यांना राज्यात पक्ष विस्तारासाठी आम्ही कशाला मदत करू. त्यापेक्षा आम्ही आमचा पक्ष मजबूत करण्याकडे लक्ष देऊ, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. थंबिदुराई यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. आम्हाला आमचे काम करू द्या. तुम्ही तुमचे काम करा, असे म्हणत त्यांनी एआयएडीएमके भाजपसोबत आघाडी करणार नसल्याचे जवळपास स्पष्ट केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास दक्षिणेतील राज्ये भाजपसाठी जास्त महत्त्वाची ठरणार आहेत. त्यासाठीच पक्षाध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी या राज्यांकडे लक्ष दिले आहे. गेल्या आठवड्यात तामिळनाडूमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या जुन्या सहकाऱ्यांशी आघाडी करण्याबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. जुन्या सहकारी पक्षांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आमची तयारी आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्याकाळात ज्या पद्धतीने आघाडीचे सरकार सत्तेमध्ये होते. त्या पद्धतीच्या आघाडीच्या यशाची नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना आठवण करून दिली आणि आघाडी करण्यासाठी भाजप सदैव तयार असल्याचे सांगितले.

वाजपेयींच्या कार्यकाळात एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा दिवंगत जयललिता यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर आता हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येणार का हे पाहणे महत्त्वाचे होते. पण थंबिदुराई यांच्या वक्तव्याने भाजपच्या आशेवर पाणी फिरवले आहे. आम्ही भाजपसोबत आघाडी करू हा जोकच आहे. आम्ही कशाला त्यांना राज्यात पक्षविस्तार करण्यासाठी मदत करू. त्यापेक्षा त्यांनी त्यांचे काम करावे आणि आम्ही आमचे काम करतो, असे थंबिदुराई यांनी म्हटले आहे.