Irfan Solanki: "मी गाढव किंवा माकड नाही... हवं तर इथेच माझा राजीनामा घ्या पण..."; कोर्टात आमदार पोलिसांवर संतापला

MLA Irfan Solanki Allegation Against Police: या आमदाराला जेव्हा जेव्हा कोर्टात हजर केलं जातं तेव्हा तेव्हा त्यांच्याबरोबर धक्काबुक्कीचा प्रकार घडतो. आज घडलेल्या प्रकारानंतर आमदाराला संताप अनावर झाला आणि त्याने पोलिसांना प्रसारमाध्यमांसमोरच सुनावलं.

Updated: Mar 17, 2023, 08:30 PM IST
Irfan Solanki: "मी गाढव किंवा माकड नाही... हवं तर इथेच माझा राजीनामा घ्या पण..."; कोर्टात आमदार पोलिसांवर संतापला title=
irfan solanki

Irfan Solanki Case: उत्तर प्रदेशमधील महाराजगंज तुरुंगामधून कोर्टात सुनावणीसाठी कानपूरमध्ये आणण्यात आलेले समाजवादी पार्टीचे (सपा) आमदार इरफान सोलंकी यांच्याबरोबर कोर्टाच्या आवारात धक्काबुक्की झाली. यानंतर सोलंकी यांनी पोलिसांवर आपला संताप व्यक्त केला. धक्काबुक्कीनंतर पोलिसांच्या गाडीमध्ये बसताना सोलंकी यांनी, 'मी काही जनावर, गाढव किंवा माकड नाही ज्यामुळे मला अशापद्धतीची वागणूक मिळतेय,' असं ओरडून सांगितलं.

नेमकं घडलं काय?

कोर्टात हजर करण्याच्या वेळेस दर वेळेस सोलंकीं यांचा कानपुरमधील पोलिसांबरोबर वाद होतो. प्रत्येक वेळेस त्यांना कोर्टात हजर करताना धक्काबुक्की आणि वाद होतो. मात्र आज सोलंकी हे धक्काबुक्कीमुळे चांगलेच संतापले. ते प्रसारमाध्यमांसमोरच पोलिसांवर डाफरले. त्यांना हवं तर त्यांनी इथंच माझा राजीनामा घ्यावा मात्र मला अशी वागणूक त्यांनी देऊ नये, असंही सोलंकी यांनी पोलिसांकडे पाहत रागात म्हटलं.

पत्नी मोठ्याने रडू लागली

आमदार सोलंकी यांना कोर्टातून पोलिसांनी पुन्हा तुरुंगात नेल्यानंतर त्यांची पत्नी नसीम या कोर्टात मोठमोठ्याने रडू लागल्या. ही सरकार सर्वांनाच त्रास देत असल्याचं नसीम म्हणाल्या. महाराजगंज तुरुंगातही आपल्याला आपल्या पतीला भेटू दिला जात नाही. आमच्या संपूर्ण कुटुंबाचा छळ केला जात आहे. आम्ही सर्व या गोष्टींना कंटाळलो आहोत, असं नसीम म्हणाल्या.

पती मेला असं समजू का?

महाराजगंज तुरुंगामध्ये पतीला नीट भेटू दिलं जात नाही. छोट्या जाळीमधून पतीला पाहता येतं. मला 5 मिनिटंही पतीला भेटू दिलं जात नाही. मी माझ्या पतीचा त्याग करु की ते माझ्यासाठी मेलेत असं समजू? रमजान जवळ येत आहे. आमचा त्रा योगीजींना दिसत नाही का? असे प्रश्न नसीम यांनी कोर्टासमोरच विचारले.

महिलेचे खोटे आरोप

एका महिलेने केलेल्या खोट्या आरोपांना सरकारने आणि पोलिसांनी खरं मानून पतीविरोधात कारवाई केली आहे. सर्व प्रकरणं खोटी आहेत. योगीजींनी माझ्या पतीची मुक्तता केली पाहिजे अशी मागणी नसीम यांनी केली आहे. सोलंकी यांची रिमांड 29 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.