बाईकवर लावल्या जाणाऱ्या या रंगीबेरंगी पताकांचा अर्थ माहित आहे?

तिबेटीयन संस्कृतीमध्ये या पताकांना अनन्यसाधारण महत्त्वं 

Updated: Dec 31, 2019, 02:54 PM IST
बाईकवर लावल्या जाणाऱ्या या रंगीबेरंगी पताकांचा अर्थ माहित आहे? title=

मुंबई: दैनंदिन आयुष्यातून वेळ काढत फिरण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून बरीच वाढली आहे. अशा या मंडळींची पावलं लडाख किंवा मग देशाच्या उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर वळतात. अर्थात इतर ठिकाणांनाही प्राधान्य दिलं जातं. पण, उत्तर भारताकडे जाणाऱ्यांची संख्या तुलनेने जास्त. या सुरेख ठिकाणांवर भटकंती केल्यानंतर परत येतेवेळी काही भेटवस्तू सोबत आणो अथवा न आणो. पण, एक गोष्ट मात्र ही मंडळी आवर्जून सोबत आणतात. ते म्हणजे रंगीत पताका किंवा लहान लहान झेंड्यांची माळ. 

बाईक, कार किंवा बॅकपॅकला ही माळ लावत आपण कुठेतरी भन्नाट ठिकाणी जाऊन आल्याचा आनंद त्यांना वाटत असतो. 

हल्ली तर या पताका इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत, की बऱ्याच ठिकाणी त्या सहज पाहता येतात. अशा या रंगीत पताकांवर जी भाषा लिहिलेली असते ती अनेकांना कळतही नाही. पण, तरीही ते सर्वांच्या मनाच्या अगदी जवळचं असतं. 

तिबेटीयन बौद्ध संस्कृतीमध्ये या पताकांना अनन्यसाधारण महत्त्वं आहे. काही ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार तिबेटच्या लोकांनी युद्धादरम्यान संरक्षणासाठी त्यांचा वापर केला होता. ज्यानंतर त्याच्यावर प्रार्थना आणि शांततेचे संदेश लिहिण्यात येऊ लागले. 

या पताका रंगीत असण्यामागेही काही कारणं आहेत. किंबहुना प्रत्येक रंगाचं आपलं असं महत्त्वं आहे. निळा, लाल, पिवळा, पांढरा आणि हिरवा अशा पाच रंगांत या पताका असतात. 

हवा, पाणी, अग्नी आणि पृथ्वी या घटकांचं प्रतिक म्हणून या पताकांचे असे रंग असतात. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य या दिशा म्हणूनही या रंगीत पताकांकडे पाहिलं जातं. 

तिबेटमध्येच प्रचलित असलेला 'ओम मनी पद् मे हूँ' हा मंत्र या पताकांवर लिहिलेला असतो. बुद्धाने शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचा संदेश या मंत्रातून मिळतो अशी अनेकांची धारणा आहे. त्याशिवाय देवाकडे आपण केलेल्या किंवा अजाणतेपणे आपल्याकडून घडलेल्या अपराधांची क्षमा मागत जे आपल्याला मिळालं आहे त्यासाठी देवाकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणूनही हा मंत्र असल्याचं म्हटलं जातं. 

आयुष्याचं सार या मंत्रात असल्याचं म्हणत तिबेटीयन संस्कृतीतील लोक या पताकांना अनन्यसाधारण महत्त्वं देतात. प्रत्येकाचा या पताकांकडे पाहण्याचा वेगळा असा दृष्टीकोन आहे. 

कोणासाठी त्या एका दैवी शक्तीचं, महत्त्वाच्या मूलमंत्राचं, शांतीचं प्रतिक आहेत. तर, अनेक फिरस्त्यांसाठी या पताका म्हणजे आठवणींचा अनमोल ठेवा आहेत हेही तितकच खरं.