जमीन खरेदीसाठी लाखोंचा खर्च करण्यापूर्वी एकदा 'ही' वेबसाईट पाहाच; क्षणात समोर येईल सविस्तर माहिती

Land Purchase Website: खात्यात ठराविक रक्कम जमा झाल्यानंतर वास्तव्यासाठी एका हक्काच्या घराची सोय झाल्यानंतर अनेकजण जमिनीमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडतात. अशा वेळी ही माहिती लक्षात घेणं महत्त्वाचं... 

सायली पाटील | Updated: Jun 27, 2023, 09:24 AM IST
जमीन खरेदीसाठी लाखोंचा खर्च करण्यापूर्वी एकदा 'ही' वेबसाईट पाहाच; क्षणात समोर येईल सविस्तर माहिती  title=
Land Purchse this website will give you all details and insights

Land Purchase Website: कितीही आलिशान घर असलं, कितीही संपत्ती असली तरीही जमीन खरेदी करून त्यावर मनाजोगं बांधकाम करण्याचा अनेकांचाच मानस असतो. काहींना आवडीच्या एखाद्या खेड्यात जमीन खरेदी करत तिथं बाग तयार करायची असते तर, काहींना चक्क शेतीही करायची असते. मुळात या गोष्टी आकारास येण्यासाठी जमिनीचा तुकडा योग्य दरात खरेदी केला जाणंही तितकंच महत्त्वाचं. पण, बऱ्याचदा असं होताना दिसत नाही. 

गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र आणि मुंबई- उपनगरांचा मुद्दा नजरेत घ्यायचा झाल्यास इथं असणाऱ्या जमिनींचे दर प्रचंड मोठ्या फरकानं वाढले आहेत. यामध्ये काहींनी खरेदी करण्यासाठी घाई केल्यामुळं त्यांचं नुकसानही झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जमिनीच्या व्यवयाहारांमध्ये अनेक तोतयांनी चुकीच्या पद्धतीनं पैसे बळकावल्याची प्रकरणं तुम्हीही पाहिली असतील. त्यामुळं जेव्हाजेव्हा जमीन खरेदीचा मुद्दा निघतो तेव्हातेव्हा काही गोष्टींची काळजी घेतली जाणं अनिवार्य आहे. 

जमीन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? 

जेव्हा अमुक एखादी व्यक्ती जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी एक पाऊल पुढे टाकते तेव्हा त्या व्यक्तीनं काही गोष्टींबाबत काळजी घेणं अपेक्षित असतं. यामध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ती जमीन कोणाची आहे, तिचं लोकेशन काय आहे आणि तिचं एकूण क्षेत्रफळ किती आहे. या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष झाल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. 

जमीन खरेदी व्यवहारांमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी ती म्हणजे अतीघाई टाळणं. बऱ्याचदा घाई केल्यामुळं या व्यवहारांमध्ये माहितीशी छेडछाड केली जाते. बऱ्याचदा चुकीची माहितीही दिली जाते. ज्यामुळं तुम्हाला लाखोंचा फटका बसू शकतो. या साऱ्यामध्ये तुम्हाला एका संकेतस्थळाची बरीच मदत होऊ शकते.  

एक Smart Trick करेल मदत.... 

तुम्हीही जमीन व्यवहारामध्ये पैसे गुंतवण्याच्या विचारात असाल, तर फार काही करण्याची गरज नाही. फक्त Google Search मध्ये जाऊन तुमच्या राज्याचं नाव टाईप करून सोबत IG सुद्धा टाईप करा. इतकं करून सर्च बटणावर क्लिक करा. लगेचच तुमच्यासमोर स्टॅम्प आणि रजिस्ट्रेशनची वेबसाईट सुरु होईल. तुम्हाला इथं अनेक पर्याय मिळतील. 

हेसुद्धा वाचा : एकाच दिवशी 5 Vande Bharat ला मोदी दाखवणार हिरवा झेंडा! महाराष्ट्राला मिळणार चौथी 'वंदे भारत'

तुम्ही खरेदी करत असणाऱ्या जमिनीची माहिती देण्याचा पर्यायही इथं उपलब्ध असेल. त्यातही तुम्हाला सविस्तर माहिती हवी असल्यास रजिस्ट्रेशन क्रमांक भरण्याचा पर्याय दिसेल. तिथं हा क्रमांक टाईप करून Enter केल्यास तुमच्यासमोर अपेक्षित जमिनीची सर्व माहिती असेल. सरकारी संकेतस्थळ असल्यामुळं इथं तुमची फसवणूकही टळते. 

सर्व माहितीची पूर्तता केल्यानंतर या संकेतस्थळावरून तुम्हाला सर्व अपेक्षित माहिती मिळेल. जिथं ती जमीन कोणाच्या नावावर आहे, तिची खरेदी केव्हाकेव्हा झाली, त्या जमिनीचं एकूण क्षेत्रफळ किती आहे ही आणि अशी इतर माहिती तुम्हाला इथं मिळेल. त्यामुळं इथून पुढं तुम्हीही अशाच जमीन खरेदीचा व्यवहार करणार असाल तर, सर्वप्रथम या संकेतस्थळावरून माहिती नक्की मिळवा.