नवी दिल्ली: 'मन की बात' करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे का देत नाही, असा आरोप होत असतानाच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 'एएनआय' वृत्तसंस्थेने घेतलेली मोदी यांची दीर्घ मुलाखत मंगळवारी संध्याकाळी ट्विटरच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरापासून ते नोटाबंदीपर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर सविस्तरपणे मते मांडली आहेत. राम मंदिरासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मित्र पक्षांकडून सरकारवर दबाव टाकला जात आहे. पण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच राम मंदिर बांधण्यासाठी वटहुकूम काढण्याचा विचार केला जाईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे वकील सर्वोच्च न्यायालयात राम मंदिरप्रश्नी खोडा घालत आहेत. त्यामुळे या खटल्याची सुनावणी धीम्या गतीने होत आहे. राम मंदिराचा प्रश्न घटनात्मक मार्गानं तडीस नेला जाईल, असं आम्ही जाहीरनाम्यात म्हटले होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकार म्हणून आमची जी जबाबदारी आहे, त्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच नोटाबंदीचा निर्णय घाईगडबडीने घेण्यात आला नव्हता. निर्णय घेण्यापू्र्वी काळा पैसा बाळगणाऱ्यांना योग्य पद्धतीने सूचित करण्यात आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'एएनआय'च्या संपादक स्मिता प्रकाश यांनी मोदींची मुलाखत घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीतील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:
१. उर्जित पटेल सहा महिन्यांपूर्वीच राजीनामा देणार होते
उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारणामुळे स्वत:हून रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला. राजीनामा स्वीकारण्यासाठी ते सहा ते सात महिने माझ्या मागे लागले होते. त्यांनी तशी लेखी विनंती मला केली होती. यामध्ये कोणतेही राजकारण नव्हते. गव्हर्नर म्हणून पटेल यांची कामगिरी उत्तम होती.
२. नोटाबंदी झटका नव्हता
नोटाबंदी म्हणजे झटका नव्हता. काळा पैसा बाळगणाऱ्या लोकांना आम्ही वर्षभरापूर्वीच ताकीद दिली होती. तुम्ही दंडाची रक्कम भरून उर्वरित रक्कम परत मिळवू शकता, असे सरकारने सांगितले होते. मात्र, इतरांप्रमाणे मोदीही काहीही करणार नाही, असे त्यांना वाटले. त्यामुळे फारच कमी जणांनी स्वत:कडील काळा पैसा जाहीर केला.
३. गांधी घराणे जामीनावर बाहेर
स्वत:च्या घराण्याच्या हिताला कायम प्राधान्य देणाऱ्यांनी अनेक वर्षे हा देश चालवला. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेले हे घराणे सध्या जामीनावर बाहेर आहे. या घराण्याची वर्षानुवर्षे चाकरी करत असलेले लोक खरी माहिती दडवून इतर गोष्टी पुढे रेटतायंत, ही खूप गंभीर गोष्ट आहे.
४. एका युद्धाने पाकिस्तान वठणीवर येणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत सीमेवरील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि हल्ल्यांवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तान सीमारेषेपलीकडून हल्ले करत आहे. एका युद्धाने पाकिस्तान सुधरेल, हा विचार खूप मोठी चूक ठरेल. पाकिस्तानला वठणीवर येण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल.
५. राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच राम मंदिर बांधण्यासाठी वटहुकूम काढण्याचा विचार केला जाईल. काँग्रेसचे वकील अडथळा आणत असल्यामुळे अयोध्या खटल्याचा निकाल लांबला आहे. राम मंदिराचा प्रश्न संविधानाच्या कक्षेत राहूनच सोडवला जाईल, असे आम्ही निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सांगितल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
६. काँग्रेसने स्वत:पासूनच मुक्त झाले पाहिजे
काँग्रेस ही एक संस्कृती आणि विचार आहे, असे म्हटले जाते. मी जेव्हा काँग्रेसमुक्त भारताविषयी बोलतो तेव्हा देश या संस्कृतीपासून आणि मानसिकतेतून मुक्त झाला पाहिजे, हे मला अपेक्षित असते. किंबहुना मी तर म्हणतो काँग्रेस पक्षाला स्वत:च्याच संस्कृतीपासून मुक्त व्हायला पाहिजे.
७. राजकीय सुडापोटी विरोधकांवर कारवाई नाही
केंद्र सरकारने कोणत्याही विरोधी पक्षातील नेत्यावर सुडापोटी कारवाई केलेली नाही. अनेक वर्षे देश चालवलेल्या घराण्यातील लोक घराण्यावर आर्थिक व्यवहाराचे आरोप आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री न्यायालयाचे खेटे घालत आहेत. या गोष्टी खूप गंभीर आहेत.
८. परदेशात पळून गेलेल्या कर्जबुडव्यांना परत आणणार
बँकांचे कर्ज बुडवून जे पळून गेलेल्यांना एक दिवस नक्की परत आणणार. यासाठी राजनैतिक आणि कायदेशीर माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. कर्जबुडव्यांची देशातील संपत्ती सरकारने जप्त केली.
९. कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना फायदा होणार नाही
मी लोकांना खोटी आश्वासने देण्याला लॉलीपॉप बोललो. भारतीय बँकांच्या पैशावर मजा करणाऱ्यांना चाप बसवला. कर्जमाफीने शेतकऱ्यांचे भले होत असेल तर जरूर करावी. मात्र, तसे होताना दिसत नाही. कर्जमाफी हा केवळ स्टंट. त्याऐवजी व्यवस्थेतील त्रुटी सुधारून शेतकऱ्यांना बळ दिले पाहिजे. आमच्या सरकारने सिंचनक्षेत्र, पायाभूत सुविधा आणि बाजारपेठेतील त्रुटी सुधारण्यावर भर दिला.
१०. गोरक्षकांकडून होणाऱ्या हिंसाचाराचा निषेध
गोरक्षकांकडून होणाऱ्या हिंसाचाराला मी निषेध करतो. मात्र, हे सर्व २०१४ नंतरच सुरु झाले का? मला याबाबत खोलात जायचे नाही. मात्र, या घटना थांबल्या पाहिजे, हे माझे स्पष्ट मत आहे. आपण इतरांच्या भावनांचा आदर करू तेव्हा इतर आपल्या भावनांचा आदर करतील. मात्र, निवडणुकांच्या तोडांवर देशात असहिष्णुता निर्माण झाल्याचे ढोल बडवायला सुरुवात होते.
११. तिहेरी तलाक आणि शबरीमाला मंदिराच्या मुद्द्याची गल्लत नको
जगातील अनेक मुस्लीम देशांनी तिहेरी तलाकवर बंदी घातली. शबरीमाला मंदिराच्या मुद्द्याशी त्याची गल्लत करु नये. तिहेरी तलाक हा धर्माचा किंवा श्रद्धेचा विषय नाही. हा लैंगिक समानता आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठातील महिला न्यायमूर्तींचे याबाबतचे मत विचारात घेतले पाहिजे.
१२. सरकारला मध्यमवर्गाच्या हिताची काळजी
मध्यमवर्गीयांना स्वाभिमानाने जगायला आवडते त्यांना कोणच्याही मदतीवर अवलंबून राहायला आवडत नाही. आमच्या सरकाराला मध्यमवर्गीय वर्गाच्या हिताची काळजी. मात्र, आता मध्यमवर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.
१३. राहुल गांधींनी राफेलबाबतचे आरोप सिद्ध करावेत
राहुल गांधी यांनी राफेल व्यवहाराबाबतचे आरोप सिद्ध करून दाखवावेत. केवळ चिखलफेक करु नये. राफेल व्यवहाराबाबत सगळ्यांनी स्पष्टीकरण देऊन झाले असतानाही काँग्रेसकडून आरोप होत आहेत. त्यामुळे मी राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात गुंतून राहणार नाहीत. यामध्ये अडकून मी माझ्या देशाच्या लष्कराला निश:स्त्र आणि कमकुवत करु शकत नाही.
१४. मित्रपक्ष वाढले पाहिजेत, हीच आमची इच्छा
या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचा उल्लेख टाळला. त्यांनी म्हटले की, आम्हाला लोकसभेला बहुमत मिळूनही आम्ही युतीचा धर्म पाळला. सरकार कोणताही निर्णय सर्व घटकपक्षांच्या सहमतीनेच घेते. मात्र, राज्य पातळीवरील राजकारण वेगळे असते. मात्र, काहींना वाटते की, दबाव टाकून काही फायदे पदरात पाडून घेता येतील. आमच्या मित्रपक्षांची ताकद वाढली पाहिजे, हीच आमची इच्छा. मात्र, प्रादेशिक महत्वाकांक्षा डावलून कोणताही पक्ष पुढे जाऊ शकत नाही.
१५. महाआघाडीचे राजकारण यशस्वी होणार नाही
यंदाच्या निवडणुकीत केवळ मोदींना विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. कधी नव्हे ते राज्य पातळीवरही विरोधक एकमेकांशी हातमिळवणी करत आहेत. परंतु, त्रिपुरा , तेलंगणा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महाआघाडीचा प्रयोग सपशेल फसल्याचे दिसून आले. मात्र, याबाबत कोणीही बोलत नाही. भाजपला लोकसभा निवडणुकीत १८० पेक्षा कमी जागा मिळतील, असे म्हटले जाते. महाआघाडी अस्तित्वात येण्यासाठी काँग्रेसकडून विरोधी पक्षांना मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत.
१६. भारताने पाकिस्तानशी चर्चा करायला कधीही नकार दिलेला नाही. सगळ्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे. मात्र, दहशतवादी हल्ले सुरु असताना चर्चा करता येणार नाही.
१७. सर्व पंतप्रधानांनी माझ्याइतकेच परदेश दौरे केले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या देशाची भूमिका मांडाव्या लागतात. त्याठिकाणी पंतप्रधानांपेक्षा कनिष्ठ दर्जाच्या व्यक्तीने भूमिका मांडल्यास फायदा होत नाही. त्यामुळे परदेश दौरे अनिवार्य आहेत. मी परदेशात जाऊन काम करतो त्यामुळे त्याची इतकी चर्चा होते.
१८. संसदेत चांगली आणि सकस चर्चा झाली पाहिजे. खासदार चांगला वक्ता नसला तरी चालेल पण तो जनतेशी जोडलेला असावा. व्यवस्थेवर अंकुश ठेवणे, हे संसदेचे काम असते. मात्र, विरोधकांच्या आरोपांमुळे या सगळ्यात अडथळे येत आहेत.
१९. माझ्या कामामुळे फायदा झाला की नाही, हा निर्णय जनतेवर सोपवतो. मात्र, माझ्या वैयक्तिक पार्श्वभूमीमुळे मी देशातील एलिट वर्गाला फारसा रुचलो नाही. मात्र, सगळ्यांना जिंकण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन.