शिवसैनिकांना अयोध्येत घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या परत फिरण्याच्या वेळेत बदल

चार्टर्ड प्लेननं उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल

शुभांगी पालवे | Updated: Nov 29, 2018, 09:14 AM IST
शिवसैनिकांना अयोध्येत घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या परत फिरण्याच्या वेळेत बदल  title=
उद्धव ठाकरे अयोध्येत

अयोध्या : उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झालेत. त्यांचं फैजाबादमधल्या विमानतळावर दुपारी दीडच्या सुमाराला अगमन झालं. चार्टर्ड प्लेननं उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल झाले. उद्धव ठाकरे विमानतळावर पोहोचताच ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं. उद्धव ठाकरे अयोध्येतल्या पंचवटी हॉटेलमध्ये थांबलेत. काही वेळात उद्धव ठाकरे संत महंतांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे शरयू नदीची आरती करतील. दरम्यान, संत-महंतांचं दर्शन घेण्यासाठी हॉटेल पंचवटीमधून बाहेर पडलेत. उद्धव ठाकरे आशिर्वाद सभेसाठी पंटवटीमधून लक्ष्मण किलाकडे रवाना झालेत. उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ वारकरी अयोध्येत पोहचले आहेत. तर प्रभू रामचंद्र साऱ्यांचे आहेत असं सांगत रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष रामविलास वेदांती यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं स्वागत केलंय. तसंच त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना प्रभू रामाचं दर्शन घेण्याचं आवाहन केलंय. 

दरम्यान, अयोध्येत शिवसैनिकांनी घेऊन आलेल्या स्पेशल रेल्वेच्या परत जाण्याची वेळ बदलण्यात आल्याची माहिती हाती येतेय. आज रात्री ११ वाजता ही रेल्वे नाशिकसाठी रवाना होणार आहे. याअगोदरच्या नियोजनानुसार, २५ नोव्हेंबर रोजी रात्री ८.०० वाजता ही रेल्वे नाशिकसाठी रवाना होणार होती. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेशन अधिक्षकांना आजच परत निघण्यासाठी पत्र लिहिलं होतं. त्यानुसार रेल्वे प्रशासनानं या स्पेशल रेल्वेच्या परत निघण्याच्या वेळात बदल केलाय. 

अधिक वाचा :- उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल, पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्यही सोबत 

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर दानवेंची प्रतिक्रिया

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्वागत केलंय... शिवसेनाच नव्हे, तर कुठलाही पक्ष राममंदिर बांधण्यासाठी पुढे येणार असेल, तर त्याचं स्वागतच आहे, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. 

राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे हेही आहेत. मुंबई विमानतळावरून विशेष विमानाने ते अयोध्येसाठी रवाना झाले. या दौऱ्यात उद्धव लक्ष्मण किल्ल्याला भेट देणार आहेत. तसंच संध्याकाळच्या सुमारास शरयू नदीतीरावर आरती करणार आहेत. याशिवाय विविध साधू महंतांचे ते आशीर्वादही घेणार आहेत. तत्पूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्धव यांच्याशी दौऱ्याविषयी चर्चा केली. 

मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

दरम्यान, अयोध्येच्या मुद्यावरून एकीकडे राजकीय वातावरण तापलंय. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष बैठक बोलावलीय. रात्री आठ वाजता ही बैठक बोलावण्यात आलीय.