सोन्या-चांदीच्या दरात वाढ; काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जगभरासह देशातही शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे.

Updated: Apr 7, 2020, 05:50 PM IST
सोन्या-चांदीच्या दरात वाढ; काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात मंगळवारी मोठी वाढ पाहायला मिळाली. 7 एप्रिल रोजी सकाळी सोन्याच्या किंमतींनी रेकॉर्ड करत MCXवर सोन्याचा दर 45,724 प्रति 10 ग्रॅमवर पोहचला. सोन्याच्या दरांत मंगळवारी जवळपास 1,428 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढीची नोंद करण्यात आली. सोन्यासह चांदीच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. MCXवर चांदीच्या किंमतीत 2,167 रुपये प्रति किलो इतक्या वाढीची नोंद झाली. या वाढीनंतर चांदीचा दर 43,390 रुपये प्रति किलोवर पोहचला होता.

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जगभरासह देशातही शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. अशात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करत आहेत. लॉकडाऊननंतर भारतात सराफा बाजारात सोन्याच्या दरांत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. 

इंडिया बुलियन ऍन्ड ज्वेलर्स असोसिएशननुसार, कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे आरबीआयकडून व्याज दरांत कपात करण्यात आली आहे. त्याचा सर्वाधिक फायदा सोन्याला होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमतीत अधिक वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

तज्ञांच्या मते, आर्थिक संकटावेळी गुंतवणूकदारांची पहिली पसंती सोन्याला मिळते. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, शेअर बाजारातील अनिश्चितता या सर्वांचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भारतात सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 50000 रुपयांची पातळी ओलांडू शकत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

31 मार्च 2019 रोजी सोन्याचा दर 31998 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर आता 31 मार्च 2020 रोजी सोन्याचा दर जवळपास 43000 रुपयांवर बंद झाला. लॉकडाऊनमुळे 14 एप्रिलपर्यंत सराफा बाजार बंद आहे. परंतु सोनं वायदा बाजारात मात्र तेजीत आहे.