LokSabha: एक, दोन नव्हे तर तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभूत झाला आहे 'हा' उमेदवार

LokSabha: लोकसभा निवडणुकीत के पद्मराजन पुन्हा एकदा आपलं नशीब आजमवणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत 238 वेळा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 28, 2024, 04:25 PM IST
LokSabha: एक, दोन नव्हे तर तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभूत झाला आहे 'हा' उमेदवार title=
(Photo Credit: AFP)

LokSabha: निवडणूक म्हटलं की ती प्रत्येक पक्ष आणि उमेदवार जिंकण्यासाठीच लढवत असतो. यामध्ये काहींना यश मिळतं, तर काहींना मात्र अपयशाचा सामना करावा लागतो. पण तामिळनाडूतील एक उमेदवार तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभूत होऊनही पुन्हा एकदा नशीब आजमवणार आहे. टायर रिपेअरचं दुकान चालवणारे के पद्मराजन 1998 पासून निवडणूक लढवत आहेत. पण त्यांना एकदाही यश आलेलं नाही. त्यातच आता ते आगमी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. 

के पद्मराजन जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हा सर्वजण त्यांच्यावर हसले होते. पण सर्वसामान्य माणूसही निवडणूक लढवू शकतो हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. सर्व उमेदवारांना निवडणुकीत जिंकायचं असतं, पण मला नाही असं ते सांगतात. निवडणुकीत सहभागी होणं हाच आपला विजय असल्याची भावना ते व्यक्त करतात. पराभव झाल्याने आपल्याला वाईट वाटत नाही असंही ते सांगतात. 

आगामी लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूच्या धरमपुरी येथून ते उभे राहणार आहेत. इलेक्शन किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के पद्मराजन यांनी राष्ट्रपतीपदापासून ते स्थानिक निवडणुकीपर्यंत सर्व निवडणुका लढवल्या आहेत. यादरम्यान नरेंद्र मोदी, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, राहुल गांधी अशा दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघातूनही त्यांनी नशीब आजमवलं आणि पराभूत झाले. 

"माझ्यासाठी विजय ही प्राथमिकता नाही. समोर कोण उमेदवार आहे याची मी चिंता करत नाही," असं ते सांगतात. पण निवडणूक लढताना त्यांना अमाप पैसा खर्च करावा लागला आहे. तीन दशकांच्या या दीर्घ कालावधीत आपण हजारो डॉलर्स गमावले असल्याचं ते सांगतात. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीतील 25 हजारांच्या सेक्युरिटी डिपॉझिटचा समावेश आहे. जर त्यांना 16 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली नाही तर ते पैसे परत मिळत नाहीत. 

सर्वात अयशस्वी उमेदवार म्हणून त्यांची लिमका बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. के पद्मराजन यांनी सर्वोत्तम कामगिरी 2011 मध्ये होती. मेट्टूरमधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी 6273 मतं मिळाली होती. यावेळी विजेच्या उमेदवाराला 75 हजार मतं मिळाली होती. 'मला एकाही मताची अपेक्षा नव्हती. पण लोक मला स्विकारत असल्याचं दिसत आहे,' असं ते म्हणाले होते.

टायर रिपेअर शॉपसह के पद्मराजन होमिओपथिक औषधंही पुरवतात. तसंच स्थानिक मीडियात संपादक आहेत. पण निवडणूक लढवणं हा सर्वात महत्त्वाचं काम असल्याचं ते सांगतात. लोक उमेदवारी अर्ज भरण्यास घाबरतात. पण मला जनजागृती करण्यासाठी त्यांचा रोल मॉडेल व्हायचं आहे असं ते सांगतात.