....आणि साठीनंतर विवाहबंधनात अडकले आजी- आजोबा

जुळून येती रेशीमगाठी..... 

Updated: Dec 29, 2019, 03:14 PM IST
....आणि साठीनंतर विवाहबंधनात अडकले आजी- आजोबा title=
छाया सौजन्य- एएनआय

त्रिशूर : प्रेमाची भावना काही कल्पना न देताच आपल्या जीवनात डोकावू पाहते. अनेकदा तर, या भावनेची अनुभूती झाल्यानंतर आपण स्वत:सुद्धा अतिशय अवाक असतो. अशाच निस्वार्थ भावनेची जाणीव केरळमधील एका जोडीला झाली आणि त्यांनी थेट लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता तुम्ही म्हणाल याव नवल काय? 

तर, नवल असं की Kochaniyan Menon कोचनियन मेनन (६७) आणि Lakshmi Ammal लक्ष्मी अम्मल (६५) यांची भेट शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या एका वृद्धाश्रमात झाली. इथेच त्यांच्यातील प्रेम बहरलं आणि केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील रामवरमपूरम येथील वृद्धाश्रमातच त्यांनी लग्नाच्या गाठीही बांधल्या. शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा विवाहसोहळा पार पडला. 

केरळ राज्याचे कृषीमत्री व्ही.एस. सुनील यांनी या सोहळ्याला हजेरी  लावली होती. त्यांच्या उपस्थितीतच लक्ष्मी अम्मल आणि मेनन यांचा या अनोखा विवाहसोहळा पार पडला. प्रथमत: हे लग्न ३० डिसेंबरला होणार होतं. पण, ठरलेल्या तारखेच्या काही दिवस आधीच हा समारंभ पार पडला. यावेळी नववधू रुपात साजश्रृंगार केलेल्या लक्ष्मी यांच्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. लाल रंगाच्या पारंपरिक सिल्कच्या साडीला त्यांनी कागी दागिन्यांची जोड दिली होती. तर, कोचनियान मेनन यांनीही यावेशी पारंपरिक मुंडू (धोतर/ लुंगी) आणि शर्ट असा वेश केला होता. 

'द न्यू मिनिट'च्या वृत्तानुसार वृद्धाश्रमाशी संलग्न असणाऱ्या व्यवस्थापकांनी या विवाहसोहळ्याविषयी माहिती दिली. या विवाहसोहळ्यापूर्वी शुक्रवारी मेहंदी समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यानंतर शनिवारी मंडपम विधीमागोमाग 'सद्या' म्हणजेच मेजवानीचंही आयोजन करण्यात आलं होतं. 

विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

लक्ष्मी आणि मेनन हे गेल्या तीस वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. मधील काही वर्षे त्यांचा एकमेकांशी काहीच संपर्क नव्हता. कोचनियान हे लक्ष्मी यांच्या पतीचे सहायक होते. लक्ष्मी यांच्या पतीचं २१ वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. पतीच्या निधनानंतर त्या त्यांच्या नातेवाईकांसोबत राहात होत्या. ज्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्या या आश्रमात आल्या. याच आश्रमात मेनन दोन महिन्यांपूर्वी आले. या नात्याकडे खुद्द लक्ष्मी एका आशीर्वादाप्रमाणे पाहतात. 

वाढतं वय पाहता या नात्यात आपण कुठवर एकत्र असू ठाऊक नाही. पण, या प्रवासात आम्ही कायमच आनंदात राहू. मुळात या प्रवासात आपल्या बाजूने कोणतरी कायम असेल,  कोणाचीतरी साथ असेल ही भावनाच सुखावह असल्याची भावना लक्ष्मी यांनी मनापासून व्यक्त केली.