शेवटी बापाचं काळीज ते! लेकीसाठी त्याने दिली शेवटपर्यंत झुंज; बिबट्याचा जबड्यात हात घातला अन्...

Father Saved Daughter From Leopard: लेकीला बिबट्याच्या जबड्यातून वाचवण्यासाठी बापाने जीवाची पर्वा न करता बिबट्याशी दोन हात केले. व आपल्या लेकीचा जीव वाचवला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 6, 2023, 01:06 PM IST
शेवटी बापाचं काळीज ते! लेकीसाठी त्याने दिली शेवटपर्यंत झुंज; बिबट्याचा जबड्यात हात घातला अन्... title=
Man Fights Off Leopard To Save daughter in uttar pradesh

Father Fought With Leopard For Daughter: आपल्या लेकीसाठी बाप नेहमीच हळवा असतो. लेकीवर आलेले संकट स्वतःवर घ्यायलाही मागेपुढे बघत नाही. असाच एक थरारक प्रसंग घडला आहे. लेकीला बिबट्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी बापाने कोणताही विचार न करता थेट त्याच्याशी झुंज दिली. आपल्या चार वर्षांच्या लेकीला सुखरुप ठेवण्यासाठी बापाने स्वतःवर घाव घेतले. ही थरारक घटना उत्तर प्रदेशमधील बहराइच येथे घडली आहे. या घटनेनंतर वन विभागाने 10 हजारांची मदत देऊ केली आहे. (Father Saved Daughter From Leopard)

कतर्निया घाटपरिसरात ही अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. जंगलातून भटकत भटकत बिबट्या गावात आला होता. गावात भटकत असताना हिंस्त्र बिबट्या घरात घुसला. तिथेच खाटेवर झोपलेल्या 4 वर्षांच्या सुहानीला जबड्यात पकडून जंगलाकडे धाव घेतली. सुहानी रडायला लागल्यानंतर तिचे वडिल रामबक्श घटनास्थळी पोहोचले. आपल्या पोटचा गोळ्याला अशा अवस्थेत पाहून त्यांचे अवसानच गळाले. लेकीला वाचवण्यासाठी त्याने पुढे होत बिबट्यासोबत दोन हात केले. 

लेकीला वाचवण्यासाठी रामबक्शने बिबट्यासोबत झुंज दिली. दोघांमध्ये बराचकाळ संघर्ष सुरू होता. आरडा-ओरडा ऐकून गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांचा जमाव पाहून बिबट्याने मुलीला तिथेच सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात मुलीला आणि वडिलांना गंभीर दुखापत झाली आहे. वन विभागाने दोघांच्या उपचारासाठी 10 हजारांची मदत निधी देऊ केली आहे. 

बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुहानीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्या गळ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. रामबक्षी हे शेतकरी असून गावातच त्यांचे घर आहे. रामबक्ष यांनी म्हटलं आहे की, बिबट्या घराजवळ आला तेव्हा त्यांची मुलगी अंगणातल्या खाटेवर झोपली होती. तर पत्नी स्वयंपाकघरात काम करत होती. व मी आतल्या खोलीत काम करत बसलो होते. अचानक मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून रामबक्ष धावत अंगणात आले. 

अंगणात येताच त्यांनी पाहिलं की बिबट्याने जबड्यात लेकीला पकडले आहे. मुलीला अशा अवस्थेत पाहून मी कोणताही विचार न करता त्याच्यावर बिबट्यावर झेप घेतली व त्याच्या जबड्यातून लेकीची सुटका करण्यासाठी धडपडू लागलो. बिबट्याने माझ्यावरही हल्ला केला. तिथे जवळपास असलेल्या काठिनेच मी बिबट्यावर वार केले. यादरम्यान बिबट्यानेही माझ्यावर अनेकवेळा वार केले. जवळपास पाच ते दहा मानिटे आमच्यात संघर्ष सुरु होता. अखेर गावकऱ्यांचा आवाज ऐकून बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली. त्यानंतर जखमी झालेल्या आपल्या लेकीला घेऊन ते आणि त्यांची पत्नी सरकारी आरोग्य केंद्रात दाखल झाले. तिथे त्यांच्यावर व मुलीवर उपचार सुरु आहेत.