राफेलच्या नव्या करार प्रक्रियेपासून मोदींनी पर्रिकरांना दूर ठेवले- राहुल गांधी

मोदी त्यांना गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्यास घाबरत असल्याचेही राहुल यांनी म्हटले होते.

Updated: Jan 29, 2019, 10:38 PM IST
राफेलच्या नव्या करार प्रक्रियेपासून मोदींनी पर्रिकरांना दूर ठेवले- राहुल गांधी title=

पणजी: राफेल विमानांच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने नव्याने केलेल्या करारात तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची कोणतीच भूमिका नव्हती, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सुट्टीसाठी कुटुंबीयांसोबत गोव्यात आहेत. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांनी अचानकपणे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. मात्र, या चर्चेचा नेमका तपशील समोर आला नव्हता. यानंतर पणजी येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना याबद्दल सांगितले. त्यांनी म्हटले की, माजी संरक्षणमंत्र्यांशी मी चर्चा केली. तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्सशी नव्याने केलेल्या करारात माझी कोणतीही भूमिका नव्हती. हा दावा करून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. 

स्वत:च्या मुलांवर प्रेम असेल, तर मोदींना नव्हे 'आप'ला मतं द्या- अरविंद केजरीवाल

मध्यंतरी राहुल गांधी यांनी लोकसभेत एका ऑडिओ क्लीपचा हवाला देत मनोहर पर्रिकर यांच्याकडे राफेल कराराबाबतची महत्त्वाची माहिती असल्याचा दावा केला होता. त्यामुळेच मोदी त्यांना गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्यास घाबरत असल्याचेही राहुल यांनी म्हटले होते. मात्र, या सगळ्यानंतर राहुल यांनी अचानकपणे मनोहर पर्रिकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही भेट वैयक्तिक स्वरुपाची असून यावेळी आपण पर्रिकर यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचे ट्विट राहुल यांनी केले होते.