धनी तुमच्यासाठी काय पण! लग्नासाठी ८० किलोमीटर चालत वधूने गाठले सासर

लॉकडाऊनमुळे अनेक तरुण-तरुणींची लग्न करण्याची गुलाबी स्वप्नं पार धुळीला मिळाली आहेत. 

Updated: May 23, 2020, 07:49 PM IST
धनी तुमच्यासाठी काय पण! लग्नासाठी ८० किलोमीटर चालत वधूने गाठले सासर title=

कानपूर: देशातील लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांत अनेक तरुण-तरुणींची लग्न करण्याची गुलाबी स्वप्नं पार धुळीला मिळाली आहेत. लॉकडाऊनमुळे जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी आहे. त्यामुळे अनेक घरांतील लग्नाचे ठरलेले मुहूर्त नाईलाजाने पुढे ढकलावे लागले. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच नव्या संसाराची गुलाबी स्वप्नं रंगवणाऱ्या जोडप्यांना दुरावा सहन करावा लागत आहे.
 
मात्र, कानपूरमध्ये एका तरुणीने या सगळ्यावर मात करत आपल्या लग्नाची गाठ बांधली आहे. लॉकडाऊनमुळे या तरुणीचे लग्नही रद्द झाले होते. त्यामुळे ही तरुणी अस्वस्थ होती. अखेर तिने कन्नौजपर्यंतचा ८० किलोमीटर पायी चालत सासर गाठले. मुलीची जिद्द पाहून अखेरी दोन्ही बाजूकडील लोकांनी पुढाकार घेत लॉकडाऊनमध्येच दोघांचे लग्न लावून दिले. 

प्राथमिक माहितीनुसार, गोल्डी ही १९ वर्षांची तरुणी कानपूरच्या डेरा मंगलपुर येथे वास्तव्याला आहे. कन्नौजच्या तालग्राम येथील वीरेंद्र कुमार राठोडसोबत तिचा विवाह ठरला होता. ४ मे रोजी त्यांचे लग्न होणार होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हा विवाहसोहळा रद्द करावा लागला होता. त्यामुळे गोल्डीच्या मनाची चलबिलचल सुरु होती. 

अखेर गोल्डीने आपल्या सासरी चालत जाण्याचा निर्णय घेतला. बुधवारी सकाळी गोल्डी घरातून बाहेर पडली. संध्याकाळपर्यंत ८० किलोमीटर अंतर कापत ती कन्नौजला पोहोचली. गोल्डीला दरवाज्यात पाहून तिच्या सासरच्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर मुलाकडच्या लोकांनी आपण थोड्या दिवसांनी तुमचे लग्न लावून देऊ, असे सांगत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोल्डी काही केल्या ऐकायला तयार नव्हती. अखेर मुलाकडच्या लोकांनी तिची मागणी मान्य केली. यानंतर गुरुवारी गावातील मंदिरात दोघांचेही लग्न लावून देण्यात आले.