४८ तासात मान्सून केरळमध्ये! भारतीय हवामान खात्याचा अंदाज

मान्सून येत्या ४८ तासात केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय.

Updated: May 28, 2018, 06:13 PM IST

मुंबई : मान्सून येत्या ४८ तासात केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय. बळीराजासह ज्याची सर्वचजण आतूरतेनं वाट पाहात आहेत तो मान्सून, आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. रविवारी मान्सून श्रीलंकेच्या दक्षिण भागात दाखल झाला असून आज तो अरबी समुद्राच्या अन्य भागात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. केरळ आणि कर्नाटक किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे, त्याचा फायदा होणार आहे. 

दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचा दावा स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं केलाय. केरळ किनारपट्टीवर मान्सूनसारखी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती स्कायमेटचे सीईओ जतीन सिंग यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलीय. स्कायमेटनं यापूर्वीच मान्सून २८ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.