हकालपट्टीनंतर प्रशांत किशोर म्हणालेत, नितीशजी धन्यवाद !

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची जेडीयु पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. 

Updated: Jan 29, 2020, 07:58 PM IST
हकालपट्टीनंतर प्रशांत किशोर म्हणालेत, नितीशजी धन्यवाद ! title=
संग्रहित छाया

पाटणा : जनता दल युनायटेड (जेडीयु) पक्षाचे उपाध्यक्ष आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि माजी राज्यसभा खासदार पवन वर्मा यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टोला लगावला आहे. धन्यवाद देत देव तुमचे भलं करो, असे म्हणत हा टोला लगावला आहे.

पक्ष शिस्त मोडणे आणि पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर आणि माजी राज्यसभा खासदार पवन वर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, अशी माहिती पक्षाचे महासचिव आणि प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी दिली.

दरम्यान, नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर लगेचच प्रशांत किशोर यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत त्यांनी नितीश कुमार यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांनी नितीश कुमार यांना धन्यवाद देत देव तुमचे भलं करो असं म्हटले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘धन्यवाद नितीश कुमार. बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. देव तुमचे भले करो’.

प्रशांत किशोर यांनी मागील काही महिन्यांपासून वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यांची ही वक्तव्य पक्षाच्या निर्णयाविरोधातील होती. तसेच प्रशांत किशोर यांनी पक्ष अध्यक्ष नितीश कुमार यांच्याविरोधतही अपमानास्पद वक्तव्य केली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, असंही के. सी. त्यागी म्हणाले.