'१०० दिवस विकास, विश्वास, परिवर्तनाचे'; सरकारच्या कामगिरीवर मोदी खुश

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवस पूर्ण झाले. 

Updated: Sep 8, 2019, 06:26 PM IST
'१०० दिवस विकास, विश्वास, परिवर्तनाचे'; सरकारच्या कामगिरीवर मोदी खुश title=

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवस पूर्ण झाले. ट्रिपल तलाकपासून अनुच्छेद ३७०पर्यंत अनेक धाडसी आणि धडाकेबाज निर्णय मोदी सरकारनं घेतले. सरकारच्या १०० दिवसांच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं आहे. 'हे १०० दिवस विकासाचे, विश्वासाचे आणि देशात मोठ्या परिवर्तनाचे होते. हे १०० दिवस निर्णयाचे, निष्ठेचे आणि नेक नियतीचे होते. हे १०० दिवस जन संकल्पाचे, जन सिद्धीचे आणि जनहित सुधारण्याचे होते,' असं मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.

लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही जेव्हा लोकांसमोर गेलो तेव्हा काही संकल्प केले होते. यातले काही संकल्प पूर्ण झाल्यामुळे मला आनंद झाला आहे, तर यातले काही संकल्प लवकरच पूर्ण होतील, असं दुसरं ट्विट मोदींनी केलं आहे.

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यास कटिबद्ध असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. शिवाय येत्या काळात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठ्याचा संकल्पही सरकारनं केलाय.

या १०० दिवसांमध्ये मोदी सरकारने ट्रिपल तलाक कायदा मंजूर केला, शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजारांची मदत जाहीर केली, अनुच्छेद ३७० रद्द केला, १५० भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी पाठवलं. बिनकामाचे ५८ कायदे रद्द केले. राष्ट्रीयकृत बँकांचे विलिनीकरण केलं.

काँग्रेसने मात्र मोदी सरकारच्या शंभर दिवसाच्या कामगिरीवर टीकेची झोड उठवली आहे. शंभर दिवस पूर्ण केलेल्या मोदी सरकारचं अभिनंदन. विकास झालेला नाही. लोकशाही संकूचित होत चालली आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.