राहुल गांधींनी संसदेतून जाताना फ्लाईंग किस केल्याचा स्मृती इराणींचा आरोप... महिला खासदार करणार तक्रार

Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर (no confidence motion) चर्चा केल्यानंतर संसदेतून बाहेर पडताना असभ्य वर्तन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत, त्यामुळे त्यांचं असं वागणं व्यभिचारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 9, 2023, 03:41 PM IST
राहुल गांधींनी संसदेतून जाताना फ्लाईंग किस केल्याचा स्मृती इराणींचा आरोप... महिला खासदार करणार तक्रार title=

Rahul Gandhi Fying Kiss Controversy: मणिपूर हिंसाचारप्रकरणी (Manipur Violence) केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज दुसऱ्या दिवशीही चर्चा सुरू आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी मणिपूर मुद्द्यावरून मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधला. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर (PM Narendra Modi) टीका करताना त्यांची तुलना रावणाशी केली.  मोदी मणिपूरच्या जनतेचा आवाज ऐकत नाहीत, ते फक्त अदानी आणि अमित शाह या दोन जणांचाच आवाज ऐकतात, सरकार संपूर्ण देश पेटवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.  

राहुल गांधींच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संसदेत भारतमातेच्या हल्ल्याचं वक्तव्य होतं, तेव्हा काँग्रेसनं त्यावर बाकं कशी काय वाजवू शकतं, असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. राहुल गांधी यांच्या मणिपूरवरच्या भाषणानंतर उत्तर देताना स्मृती इराणींनी काँग्रेसच्या सत्ताकाळात काश्मीरी पंडितांसह देशाच्या विविध भागात झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. 1984 च्या शीख दंगलीतील काश्मिरी पंडित आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा संदर्भ देत स्मृती इराणी यांनी त्यांचा इतिहास रक्ताने माखलेला आहे असा आरोप केला.  

फ्लाईंग किसचा आरोप
दरम्यान, स्मृती इराणी यांनी बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.  भाषण संपवून संसदेबाहेर जाताना राहुल गांधी यांनी महिला खासदारांना लक्ष्य करत फ्लाइंग किस केला असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.  राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केला ाहे. भाषण संपल्यानंतर त्यांनी असभ्य वर्तन केले. त्यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत असा आरोपही स्मृती इराणी यांनी केला आहे. यातून राहुल गांधींच्या कुटुंबाचे संस्कार दिसले अशी टीकाही स्मृती इराणी यांनी केली.

भाजप खासदार पूनम महाजन यांनीही राहुल गांधी यांच्या वर्तवणावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी केलेलं वर्तण असंसदीय असून आम्ही त्याचा विरोध करतो, याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे करणार असल्याचं सांगत महिला खासदारांच्या एका गटाने लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली. 

दरम्यान, राहुल गांधींच्या भाषणानंतर काँग्रेसनं एक ट्विट केलंय. हुकूमशाह किती घाबरलेत, राहुल गांधी मणिपूरवर 15  मिनिटं बोलले. त्यापैकी संसद टीव्हीवर 11 मिनिटं लोकसभा अध्यक्ष ओम बिरलाजींनाच स्क्रीनवर दाखवण्यात आलं. राहुल गांधींना फक्त 4 मिनिटं दाखवण्यात आलं, अशी पोस्ट काँग्रेसनं केलीय.