९०० रुपये प्रती महिना... आणि खरेदी करा हिरा!

आत्तापर्यंत हिरा खरेदी करणं हे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचं समजलं जायचं... परंतु, लवकरच 'डायमंड ट्रेडिंग मार्केट'च्या एसआयपीमुळे (Systematic Investment Plan) हे शक्य होणार आहे.

Updated: Aug 10, 2017, 06:43 PM IST
९०० रुपये प्रती महिना... आणि खरेदी करा हिरा! title=

नवी दिल्ली : आत्तापर्यंत हिरा खरेदी करणं हे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचं समजलं जायचं... परंतु, लवकरच 'डायमंड ट्रेडिंग मार्केट'च्या एसआयपीमुळे (Systematic Investment Plan) हे शक्य होणार आहे.

जगातलं पहिलं डायमंड ट्रेडिंग मार्केट भारतात... 

महिन्याला केवळ ९०० रुपयांच्या गुंतवणुकीनंही तुम्हाला हिरा खरेदी करता येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतंच इंडियन कमोडिटी एक्सचेंजला (ICEX) सेबीकडून जगातील पहिलं डायमंड ट्रेडिंग मार्केट सुरू करण्याची परवानगी मिळालीय. असं मार्केट जगात कुठेही उपलब्ध नाही. याद्वारे लवकरच छोट्या ग्राहकांसाठी एसआयपी उपलब्ध होणार आहे.

कशी कराल गुंतवणूक

डायमंड एसआयपी स्कीम अंतर्गत ग्राहकांना ICEX च्या ब्रोकरकडे एक अकाऊंट सुरू करावं लागेल. त्यानंतर 'know your client' प्रोसेस पूर्ण केल्यानंतर ब्रोकरकडे काही पैसे जमा करावे लागतील. महत्त्वाचं म्हणजे, स्टॉक मार्केटप्रमाणे हा व्यवहारदेखील इलेक्ट्रॉनिक स्वरुपात म्हणजेच डीमॅट स्वरुपात होईल.

छोटी गुंतवणूक...

डीमॅट स्वरुपात हिरा उपलब्ध झाल्यानं तुम्ही गुंतवणुकीनुसार १ सेंट हिरादेखील खरेदी करु शकाल. सध्या, ३० सेंट हिऱ्याची किंमत जवळपास २४ हजार रुपये आहे... म्हणजेच ९०० रुपये प्रति सेंट... एखाद्या व्यक्तीनं प्रत्येक महिन्याला ९०० रुपये गुंतवणूक केली तर अडीच वर्षात हिरा त्याच्या मालकीचा होऊ शकेल. दरम्यान, ICEX मध्ये हिऱ्याच्या किंमतीच्या आधारावर प्रति महिन्याची एसआयपीची रक्कम कमी-जास्त होऊ शकते. 

ICEX च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदार काही महिन्यांनंतर एसआयपीची रक्कम देऊ शकले नाहीत, तर शेअर्स प्रमाणेच जितक्या वजनाचा हिरा त्यांनी खरेदी केला असेल तो त्यांच्या डिमॅट अकाऊंटमध्ये कायम राहील.