संसदेबाहेर Video शूटींग, बसने राजस्थानला गेला अन्...; ललित झाने त्या दिवशी नक्की काय काय केलं?

Parliament Security Breach Accused Lalit Mohan Jha: दिल्ली पोलिसांनी संसदेमधील सुरक्षा भेदल्यानंतर मास्टरमाईंड ललित झाने नेमकं काय काय केलं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 15, 2023, 07:30 AM IST
संसदेबाहेर Video शूटींग, बसने राजस्थानला गेला अन्...; ललित झाने त्या दिवशी नक्की काय काय केलं? title=
त्याने दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं

Parliament Security Breach Accused Lalit Mohan Jha: लोकसभेच्या कामकाजादरम्यान थेट मुख्य सभागृहामध्ये झालेल्या घुसखोरीप्रकरणातील प्रमुख सूत्रधार ललित झा याने आत्मसमर्पण केलं आहे. गुरुवारी रात्री (14 डिसेंबर रोजी) ललित झा दिल्ली पोलिसांना शरण आला. लोकसभेत आणि संसदेच्या बाहेर काही तरुण तरूणींनी धुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. गोंधळ घालण्याचा हा कट ललित झाच्या नेतृत्वाखाली रचण्यात आला होता. या गोंधळानंतर ललित झा फरार झाला होता. मागील 2 दिवसांपासून पोलीस ललित झाच्या मागावर होते अखेर त्याने आत्मसमर्पण केलं आहे. आज ललितला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.

स्वत: पोलिस स्थानकामध्ये आला

दिल्ली पोलिसांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला ललित झाच्या आत्मसमर्पणासंदर्भात माहिती दिली. संसद घुसखोरी प्रकरणातील आरोपी ललित मोहन झा हा स्वत: पोलिस स्थानकामध्ये आला. त्याची आता चौकशी केली जात आहे, असं दिल्ली पोलिस म्हणाले.
 

संसदेतील घुसखोरीनंतर ललितने काय केलं?

संसदेची सुरक्षा भेदणाऱ्या या तरुणांच्या कृत्याचा व्हिडीओ ललित मोहनने शूट केला आणि तो घटनास्थळावरुन पळून गेला. तो राजस्थानमधील नागौर येथे बसने पोहोचला. तिथे तो त्याच्या 2 मित्रांना भेटला. हे तिघेही रात्री एका हॉटेलमध्ये राहिले होते. पोलीस आपल्या मागावर आहेत याची जाणीव झाल्यानंतर ललित पुन्हा बसने नवी दिल्लीमध्ये आला आणि त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

मूळ कल्पना ललित झाचीच

लोकसभा आणि संसदेच्या आवारात नळकांड्या फोडल्याप्रकरणी आतापर्यंत अमोल शिंदे, नीलम आजाद, सागर शर्मा, मनोरंजन डी यांच्यासह आणखी दोघांना अटक केली आहे. हा संपूर्ण कट त्या ललितच्या नेतृत्वाखाली रचला गेला असून तो सुद्धा पोलिसांच्या ताब्यात असल्याने तपासाला गती मिळणार आहे. सध्या तरी सगळे आरोपी पोलीस कोठडीत आहेत. 13 डिसेंबर रोजी संसदेत गदारोळ निर्माण करण्याची मूळ कल्पना ललित झाचीच होती. ललित झानेच या सर्वांना गोंधळ घालण्यासाठी प्रवृत्त केलं आणि प्रोत्साहन दिल्याची माहिती समोर आली आहे. संसदेच्या आवारात धूराच्या नळकांड्या फोडल्याचा व्हिडीओही ललित झानं बनवला होता. व्हिडीओ  शूट केल्यानंतर तो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर ललित घटनास्थळावरुन फरार झाला होता.

7 दिवसांची पोलीस कोठडी

संसदेत घुसखोरी करणाऱ्या 4 आरोपींना 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी या आरोपींची 15 दिवसांची रिमांड द्यावी अशी मागणी केली होती. कोर्टाने 7 दिवसांच्या कोठडीला मंजूरी दिली. गरज वाटल्यास कोठडीत वाढ करण्यात येईल असं कोर्टाने सांगितलंय.