Air India च्या प्रवाशाने सीटजवळच केली लघवी अन् विष्ठा; विमान हवेत असताना घडला किळसवाणा प्रकार

Passenger Defecates Near Seat In Air India Flight: विमान काही हजार फुटांवर असतानाच या प्रवाशाने हा किळसवाणा प्रकार केला अन् एकच गोंधळ उडाला. विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 27, 2023, 09:37 AM IST
Air India च्या प्रवाशाने सीटजवळच केली लघवी अन् विष्ठा; विमान हवेत असताना घडला किळसवाणा प्रकार title=
या प्रकरणात प्रवाशाला अटक करण्यात आली आहे

Air India Passenger Defecates Near Seat In Flight:  एअर इंडियाच्या (Air India) विमानामध्ये पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. विमानामधील एका व्यक्तीने बसल्या जागीच लघवी केली आणि सीटच्या बाजूलाच बसून येण्याजाण्याच्या मार्गावरच विष्ठा केली. ही व्यक्ती नंतर विमानात संपूर्ण प्रवासात थुंकत राहिली. समोर आलेल्या माहितीनुसार हा सारा प्रकार मुंबई ते दिल्ली मार्गावरील विमानात घडला. ही घटना 24 जून रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. विमानात हा किळसवाणा प्रकार करणाऱ्या प्रवाशाचं नाव राम सिंह असं आहे. या प्रवाशाला इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय एअरपोर्ट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. राम सिंह विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाचाबाची अन् वाद

दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर राम सिंहला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये कलम 294/510 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आळा आहे. विमानप्रवासादरम्यान आपल्या सीटच्या बाजूलाच राम सिंहने लघवी आणि विष्ठा केली. त्यानंतर तो वाटेल तिकडे थुंकत राहिला असं पोलिसांनी सांगितलं आहे. ही घटना फ्लाइट क्रमांक AIC866 मध्ये घडली. राम सिंहने हा किळसवाणा प्रकार केल्यानंतर इतर सहप्रवासी आणि क्रू मेंबर्सबरोबरही या व्यक्तीने विमान हवेत असतानाच वाद घातला. या प्रकरणावरुन विमानामधील वाद चांगलाच तापला. अनेकांनी या व्यक्तीविरोधात संताप व्यक्त केला. 

सीटदरम्यानच्या पॅसेजमध्ये केली विष्ठा

विमानातील गोंधळाची माहिती पायलट आणि एअर इंडियाच्या सुरक्षा यंत्रणेला देण्यात आली. दिल्लीमध्ये विमान लॅण्ड झाल्यानंतर तातडीने राम सिंहला आयजीआय एअरपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. तिथे पोलिसांनी राम सिंहविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. राम सिंह विमानामध्ये 17 एफ या सीटवर बसला होता. त्याने विमानामध्ये सीटच्या 2 रांगांदरम्यान असलेल्या पॅसेजमध्येच लघवी आणि विष्ठा केल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

एफआयआरमध्ये काय म्हटलंय?

24 जून 2023 रोजी मुंबईवरुन दिल्लीला येणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट क्रमांक AIC 866 च्या सीट क्रमांक 17 एफवर राम सिंह नावाचा प्रवासी बसलेला होता. त्याने विमानामध्ये उघड्यावरच लघवी आणि विष्ठा करण्याबरोबरच वाटेल तिथे थुंकण्याचा प्रकार केला. यानंतर फ्लाइटमधील केबिन क्रूने या व्यक्तीला हटकलं आणि त्याला तोंडी वॉर्निंग दिली. या व्यक्तीला सीटवरुन हटवण्यात आलं. केबिन क्रू अमन वत्सने यासंदर्भातील माहिती पायलट इन कमांड असलेल्या वरुण संसारे यांना दिली. एअर इंडियाच्या सेंट्रलाइज सिक्युरिटी सिस्टीमवर तातडीने यासंदर्भात कळवण्यात आलं. विमान दिल्लीमधील इंदिरा गांधी विमानतळावर उतरल्यानंतर राम सिंहला सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात देण्यात आलं. घडलेल्या प्रकरणाबद्दल इतर सहप्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. पायलट वरुण संसारेंनी केलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

यापूर्वीही घडलाय असा प्रकार

यापूर्वी मागील वर्षी 26 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कवरुन दिल्लीला येत असलेल्या फ्लाइटमध्ये नशेत असलेल्या एका प्रवाशाने महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. शंकर मिश्रा नावाच्या व्यक्तीने बिझनेस क्लासमधील एका 70 वर्षीय महिलेच्या अंगावर लघवी केलेली.