मोदी आणि जिनपिंग यांच्या फोटोतील दगड १२०० वर्षांपासून एकाच जागेवर

हा दगड गेल्या १२०० वर्षांपासून एका जागेवर असल्याचं पौराणिक कथांनुसार बोललं जातं.

Updated: Oct 12, 2019, 01:17 PM IST
मोदी आणि जिनपिंग यांच्या फोटोतील दगड १२०० वर्षांपासून एकाच जागेवर title=
फोटो सौजन्य : ट्विटर

चेन्नई: चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग शुक्रवारी चेन्नईत दाखल झाले. त्यांचे भारतात भव्य स्वागत करण्यात आले. चेन्नईपासून जवळपास ५० किलोमीटर दूर समुद्रकिनारी असणाऱ्या महाबलीपुरम या पुरातनकालीन शहरात त्यांनी दौरा केला. यावेळी दोघांनी एका उतारावर असणाऱ्या, चेंडूप्रमाणे दिसणाऱ्या भल्यामोठ्या दगडाला भेट दिली. मोदी-जिनपिंग यांनी ज्या भल्यामोठ्या दगडाला भेट दिली तो अतिशय खास आहे. कारण हा दगड गेल्या १२०० वर्षांपासून एका जागेवर असल्याचं पौराणिक कथांनुसार बोललं जातं. मोदी आणि जिनपिंग यांच्या दौऱ्यानंतर हा 'माखन गेंद' (Krishna's Butterball) चर्चेत आला आहे.

हा दगड अतिशय विचित्ररित्या उभा आहे. दगड पाहून थोड्याशा हालचालीने तो खाली पडेल की काय असंच वाटतं. या दगडाला 'कृष्ण माखन गेंद' असंही म्हणतात. चेन्नईतील महाबलीपुरममधील हा दगड एक प्रेक्षणीय स्थळ आहे.

या विशाल दगडामागे अनेक धारणा असल्याचं सांगितलं जातं. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांच्या बालपणात खाली पाडलेला लोण्याचा चेंडू म्हणजेच हा दगड असल्याचं बोललं जातं. श्रीकृष्ण यांनी लोणी खाताना त्याचा एक थेंब खाली पाडला होता, त्यानंतर त्या थेंबाने विशालकाय दगडाचं रुप प्राप्त केल्याची धारणा आहे. 

हा रहस्यमय दगड जवळपास २० फूट उंच आणि १५ फूट रुंद असल्याचं बोललं जातं. हा कधी हलतही नसल्याची माहिती आहे. २५० टन असणाऱ्या या दगडाला हटवण्याचा प्रयत्नही करण्यात आला पण तो सफल झाला नसल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. 

या दगडाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. हा दगड इथे कसा आला?, इकतं वजन असूनही एका उतारावर तो कसा टिकून आहे? याबाबत कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची चेन्नईतील भेट सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) आणि चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग  (Xi Jinping) यांची आज विविध विषयांवर महाबलीपूरम (Mahabalipuram)  इथे चर्चा होणार आहे. शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे.

आज मोदी आणि जिनपिंग व्यापार, दहशतवाद अशा अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर हे दोन नेते यावेळी चर्चा करतील. डोकलाम संघर्षांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची चीनमधील वुहान येथे भेट झाली होती त्याचप्रमाणे आता दोन्ही नेते दुसऱ्यांदा काश्मीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांशी चर्चा करणार आहेत.