'पंतप्रधानांना ठोस सांगायचं नसेल तर देशाला गोंधळात का टाकायचे?'

 पंतप्रधानांच्या भाषणावर विरोधकांनी टीकेची झोड उडवली

Updated: May 13, 2020, 06:50 AM IST
'पंतप्रधानांना ठोस सांगायचं नसेल तर देशाला गोंधळात का टाकायचे?' title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधत 'लॉकडाऊन ४' चे संकेत दिले. तसेच मध्यमवर्गियांसाठी पॅकेज जाहीर केले. या संपूर्ण भाषणात गरजेच्या असलेल्या ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप करत पंतप्रधानांच्या भाषणावर विरोधकांनी टीकेची झोड उडवली आहे. पंतप्रधानांना ठोस सांगायच नसेल तर देशाला गोंधळात का टाकायचे? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 

पंतप्रधानांना स्वत:हून कोणती वाईट किंवा कठोर बातमी देशासमोर द्यायची नाहीय. केंद्रीय अर्थमंत्री किंवा राज्यांतील मुख्यमंत्र्यांकरवी तशा बातम्या वदवून घेतल्या जातील. कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्दे

मग जर काही ठोस सांगायचेच नसेल तर लाईव्ह येऊन देशवासियांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण का करायचे ? असा प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केलाय. 

पंतप्रधानांनी संघटित मध्यमवर्गासाठी २० लाखचे पॅकेज जाहीर केले. पण पुन्हा एकदा असंघटित कामगार आणि स्थलांतरित वर्गाच्या पदरी निराशाच पडलेली दिसत आहे. 

मध्यम वर्गाची बाजू घेण्याच्या आणि आर्थिक दुर्बल वर्गाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका तिसऱ्या टप्प्यात दिसून आली. याचीच पुनरावृत्ती चौथ्या टप्प्यातही सुरू असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

पंतप्रधान काय म्हणाले ?

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात देशाला स्वयंपूर्ण करण्याच्यादृष्टीने भारतीयांनी विचार करायला सुरुवात करावी, या मुद्द्यावर विशेष भर दिला. कोरोनाच्या संकटामुळे जागतिक व्यवस्थेतील कच्चे दुवे उघडे पडले आहेत. या काळात आपल्याला स्थानिक स्रोतच अधिक कामाला आले, याकडे मोदींनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या संकटापूर्वी भारतात पीपीई किट आणि एन-९५ मास्कचे नाममात्र उत्पादन केले जायचे. मात्र, सध्या भारतामध्ये प्रत्येक दिवशी जवळपास दोन लाख पीपीई किट आणि एन-९५ मास्कचे उत्पादन होते. भारताने संकटाचे संधीत रुपांतर केल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मोदींनी सांगितले.