कॉमेडियन भगवंत मान यांनी दिग्गजांना लोळवलं, चॅलेंजरकडून लाफ्टर शोच्या जजला धोबीपछाड

भगवंत मान यांच्या रूपात पंजाबात पुन्हा एकदा चैतन्याचे नवे बादल आलेत. भगवंत मान त्यांच्या कुटुंबियांसाठी काल परवापर्यंत काजव्यासारखे होते. मात्र हाच काजवा आता पंजाबच्या राजकारणात चमचमता तारा बनलाय.

Updated: Mar 10, 2022, 10:25 PM IST
कॉमेडियन भगवंत मान यांनी दिग्गजांना लोळवलं, चॅलेंजरकडून लाफ्टर शोच्या जजला धोबीपछाड title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : पंजाबमध्ये आपनं जोरदार मुसंडी मारत काँग्रेस आणि अकाली दलाचा सुपडा साफ केलाय. या विजयाचे शिल्पकार ठरले ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान. स्टँडअप कॉमेडियन ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असा दमदार प्रवास करत भगवंत मान यांनी विरोधकांना धोबीपछाड दिलाय. (punjab election result 2022 aam admi party bhagwant mann navjot sidhu)

कॉमेडीचे दोन दिग्गज, एक सिद्धू पाजी आणि दुसरे भगवंत मान. चॅलेंज होतं द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शोचं. नवज्योत सिंग सिद्धूंनी (navjot sidhu) 9 वर्षांपूर्वी दिलेलं आव्हान भगवंत मान (bhagwant mann) यांनी लिलया पेललं आणि डरकाळी फोडत सारा पंजाब काबीज केला. भगवंत मान यांचा पंजाबमधला हिट परफॉर्मन्स पाहून आता सिद्धू पाजीवर ठोको ताली म्हणण्याची वेळ आलीय.

तमाम एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरवत पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून भगवंत मान यांच्या रूपात एक नवं नेतृत्व उदयास आलंय. 

भगवंतसिंग मान यांच्या राजकीय कारकीर्दीला 2011 साली  सुरूवात झाली. मनप्रित बादल यांच्या पीपल्स पार्टी ऑफ पंजाब या पक्षातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. संगरुरमधील लेहरगा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली मात्र ते पराभूत झाले.

पुढे आम आदमी पक्षात प्रवेश करत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संगरुर लोकसभा मतदारसंघातून अकाली दलाचे ज्येष्ठ नेते सुखदेव सिंग धिंडसा यांचा पराभव केला. अरविंद केजरीवाल यांनी एसएमसच्या माध्यमातून पोल घेत त्यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं आणि त्यांनी हा विश्वास सार्थकी ठरवला.

भगवंत मान यांच्या रूपात पंजाबात पुन्हा एकदा चैतन्याचे नवे बादल आलेत. भगवंत मान त्यांच्या कुटुंबियांसाठी काल परवापर्यंत काजव्यासारखे होते. मात्र हाच काजवा आता पंजाबच्या राजकारणात चमचमता तारा बनलाय.