'राहुल गांधी नुकतेच इटलीहून परतलेत, त्यांची कोरोना टेस्ट झालेय का?'

इटलीमध्ये करोनाची लागण झाल्याने आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे.

Updated: Mar 5, 2020, 12:08 PM IST
'राहुल गांधी नुकतेच इटलीहून परतलेत, त्यांची कोरोना टेस्ट झालेय का?' title=

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी काही दिवसांपूर्वीच इटलीहून परतले आहेत. त्यामुळे त्यांचीही इतरांप्रमाणे कोरोना टेस्ट व्हायला हवी, असे वक्तव्य दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश बिदुरी यांनी केले. ते गुरुवारी संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राहुल गांधी यांनी नुकताच दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला होता. यावरून बिदुरी यांनी राहुल यांना लक्ष्य केले. राहुल गांधी नुकतेच इटलीहून परतले आहेत. विमानतळावर त्यांची तपासणी झाली का, हे मला माहिती नाही. मात्र, वैद्यकीय तपासणी करून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे, का हे तपासले पाहिजे, असे बिदुरी यांनी म्हटले. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी गुरुवारी संसदेत हजेरी लावली होती. यावेळी ते संसद परिसरात काँग्रेस नेत्यांसमवेत दिसून आले. 

दिल्लीत कोरोना व्हायरसची दहशत; पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा होली मिलन कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे टाळावे, असा सल्ला अनेक तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले होते. 

कोरोनामुळे मुंबईच्या बाजारपेठेत चिनी वस्तूंचा तुटवडा

इटलीमध्ये करोनाची लागण झाल्याने आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत दिल्लीतही करोनाचा वेगाने फैलाव झाला असून आतापर्यंत २९ जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये इटलीहून आलेल्या १६ पर्यटकांचा समावेश आहे.