नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरच्या लोकसभेतील अविश्वास ठरावादरम्यान शिवसेनेतही अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतील पडद्यामागच्या घडामोडी पहिल्यांदा 'झी २४ तास'वरून तुमच्यापर्यंत पोहचत आहेत. मोदी सरकारच्या बाजूनं पक्षातील मतदान करण्याचा व्हीप खासदारांना जारी केल्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांना 'चीफ व्हीप' अर्थात 'मुख्य प्रतोद प्रमुख' पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी काही खासदारांना फोन करून व्हीप काढल्याबद्दल चांगलंच सुनावल्याचंच समजतंय. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे एक पत्रकार परिषदही घेणार आहेत.
न्यूज एजन्सी एएनआयनं गुरुवारी शिवसेनेनं आपल्या खासदारांसाठी एक व्हिप जारी केल्याचं म्हटलं होतं... यामध्ये शिवसेनेच्या खासदारांनी अविश्वास प्रस्तावादरम्यान मोदी सरकारच्या बाजूनचं मतदान करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. खैरेंनी हा निर्णय कुणाला विचारून घेतला होता? किंवा पक्षातील वरिष्ठांशी चर्चा न करताच खैरेंनी हा निर्णय घेतला होता का? असा प्रश्न आता विचारला जातोय.
दरम्यान, आज अविश्वास ठरावादरम्यान चर्चेवर बहिष्कार टाकण्याचे आदेश खासदारांना वरिष्ठांकडून देण्यात आलेत. या अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात किंवा बाजूनं शिवसेना मतदान करणार नाही.