बुलेटभोवती जमलेली गर्दी आग विझवत असतानाच टाकीचा स्फोट; अंगावर शहारे आणणारा VIDEO, कधीच करु नका या चुका

हैदराबादमध्ये (Hyderabad) धावत्या रॉयल एनफिल्डला (Royal Enfield) आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. आग लागल्यानंतर बाईकचा स्फोट झाला. या स्फोटामुळे एकाचा मृत्यू झाला असून, 9 लोक गंभीर जखमी झाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: May 13, 2024, 02:45 PM IST
बुलेटभोवती जमलेली गर्दी आग विझवत असतानाच टाकीचा स्फोट; अंगावर शहारे आणणारा VIDEO, कधीच करु नका या चुका title=

तुम्ही आतापर्यंत कार तसंच इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याचं ऐकलं किंवा पाहिलं असेल. पण आता रॉयल एनफिल्ड बाईकमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. बुलेट रस्त्यावरुन धावत असतानाच तिच्यात आग लागली आणि त्यानंतर एकच धावपळ सुरु झाली. यादरम्यान काही लोकांनी पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग विझण्याऐवजी भडकली आणि गाडीजवळ उपस्थित सर्वजण त्यात होरपळले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

हैदराबादच्या मोघालपुरा भवानीपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे. येथे वोल्टा हॉटेलजवळ एका बुलेट बाईकच्या इंजिनला आग लागली. आग लागल्यानंतर दुचाकीस्वाराने तात्काळ उडी मारुन आपला जीव वाचवला. पण यावेळी तिथे उपस्थित लोक आग विझवण्यासाठी पुढे आले. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओत दिसत आहे की, रस्त्याच्या मधोमध एक दुचाकी जळत आहे. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्यांपैकी काहीजण आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आगीवर पाणी मारत असतानाच इंधन टाकीचा स्फोट होतो. स्फोटानंतर बाईकजवळ उपस्थित अनेकजण आगीच्या भक्ष्यस्थानी येतात. यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरु होते. व्हिडीओ एक व्यक्ती आग लागल्यानंतर खाली पडलेला दिसत आहे. या आगीत 10 जण होरपळले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

बुलेटमध्ये आग लागण्याचं कारण काय?

भवानीपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालास्वामी यांनी 'आज तक'शी संवाद साधताना सांगितलं की, "बुलेटमध्ये आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती घेतली जात आहे. प्राथमिकदृष्ट्या इंजिन गरम झाल्याने प्रकार घडल्याचं वाटत आहे". स्वामी यांनी सांगितलं आहे की, बऱ्याच वेळापासून तो बाईक चालवत होता आणि नंतर अचानक इंजिनमध्ये आग लागली. 

घटनास्थळी उपस्थित लोक बाईकवर पाणी आणि माती फेकून ती विझवण्याचा प्रयत्न करत होते. पण टाकीचा स्फोट झाल्याने ते आगीत होरपळले. जखमी झालेल्यांपैकी एकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला असल्याचं बालास्वामी यांनी सांगितलं आहे. 

बाईकला आग लागल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.

1 - कधीही आग लागलेल्या वाहनाजवळ जाऊ नका
2 - आग लागल्यानंतर तात्काळ स्थानिक फायर ब्रिगेडशी संवाद साधा
3 - आग लागल्यानंतर इंधन टाकीचा स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वत: ती विझवण्याचा प्रयत्न करु नका. 
4 - आग लागलेल्या वाहनाभोवती गर्दी करु नका