'विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही'

मुळात दोन देशांचे नागरिकत्व असणाऱ्यांच्या अंगात देशभक्ती कुठून येणार? 

Updated: Jun 29, 2020, 10:58 AM IST
'विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही' title=

नवी दिल्ली: परदेशी महिलेल्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही, असा टोला साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसला लगावला आहे. यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी रविवारी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले. साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले की, काँग्रेसने आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यांच्या पक्षातील लोकांकडे कशाप्रकारे बोलावे याची सभ्यता नाही. तसेच त्यांच्याकडे संस्कार आणि देशभक्तीही नाही. मुळात दोन देशांचे नागरिकत्व असणाऱ्यांच्या अंगात देशभक्ती कुठून येणार? चाणक्याने म्हटले होते की, या भूमीतील सुपुत्रच देशाचे रक्षण करु शकतो. परदेशी महिलेल्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही, असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले होते. 

'काँग्रेसच्या काळात तुरुंगात झालेल्या छळामुळे मला आता डोळ्यांनी धड दिसतही नाही'

त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. काँग्रेस नेते जीतू पटवारी यांनी साध्वी प्रज्ञा यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, कोणताही देशभक्त दहशतवादी असू शकत नाही. कोणताही देशभक्त गोडसेभक्त असू शकत नाही. 

VIDEO: तुरुंगातील अत्याचारांबद्दल सांगताना साध्वी प्रज्ञांना भर सभेत रडू कोसळले

यापूर्वी साध्वी प्रज्ञा यांनी आपल्या शारीरिक व्याधींसाठी काँग्रेसला जबाबदार धरले होते. काँग्रेसच्या राजवटीत मी नऊ वर्षे तुरुंगात होते. तुरुंगात झालेल्या छळादरम्यान मला अनेक दुखापती झाल्या होत्या. तसेच अनेक जुन्या व्याधीही बळावल्या. या सगळ्यामुळे माझ्या डोळ्यांचा रेटिना आणि मेंदूत सूज आणि पू  तयार झाला. त्यामुळे मला उजव्या डोळ्याने भुरकट दिसते. तर डाव्या डोळ्याने मला काहीच दिसत नाही. हे सगळे काँग्रेसच्या काळातील छळामुळे झाल्याचा आरोप साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला होता.