मला पाणी पाजण्याचा विचार करणाऱ्यांना पाणी देणार- उदनयनराजे

 कास तलावात सध्या साताऱ्याला 15 दिवस पुरेल ऐवढेच पाणी शिल्लक आहे. 

Updated: Jun 3, 2019, 10:56 PM IST
मला पाणी पाजण्याचा विचार करणाऱ्यांना पाणी देणार- उदनयनराजे  title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची उंची वाढवण्याचे काम सध्या सुरू आहे. या तलावाची उंची वाढल्यामुळे साठवण क्षमतेत पाच पटीने वाढ होणार आहे. या कामाची पाहणी साताऱ्याचे खा.उदयनराजे यांनी आज केली. उन्हाळ्यामुळे या तलावातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे कास तलावात सध्या साताऱ्याला 15 दिवस पुरेल ऐवढेच पाणी शिल्लक आहे. या पाहणी नंतर खा.उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. कास प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना पाणी देण्याचे काम मी करणार आहे. जेणेकरून जे नेक लोक आहेत जे भविष्यात मला पाणी पाजण्याचा विचार करत आहेत त्यांना तसे विचार येऊ नयेत यासाठी त्यांना पाणी देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकांनीसुद्धा पाण्याचा काटकसरीने वापर करावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा ही यावेळी दिला आहे. सातारा शहरातील हद्दवाढी बाबत बोलताना खा.उदयनराजे यांनी काहीही झाले तरी हद्दवाढ ही होणारच असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीनंतर तुमच्या स्वभावात बदल झाला असल्याचे दिसत आहे याबाबत विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले पत्रकारांमुळेच मी संयमाने वागायला शिकलो आहे तुमच्या मुळेच मी परिपक्व झालो असल्याचा मिश्किल टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.नंतर स्वःला सावरत तस काही नाही मी आहे तसाच आहे असे देखील त्यांनी यावेळी हसून सांगितले.

काही दिवसांपूर्वी खा. उदयनराजेंनी मी फक्त एकालाच घाबरतो ते म्हणजे अभिजित बिचुकले याला तो साताऱ्याचा अभिजित बिचुकले सध्या मराठी  रिएलिटी शोमध्ये अडचणीत असल्याबाबत उदयनराजे यांना विचारण्यात आले.  त्याचे सारखेच फोन येतात त्यामुळे मी त्याला घाबरत असल्याचे मिश्किल उत्तर त्यांनी दिले. त्याने आतापर्यंत अनेकांना अडचणीत आणले त्यामुळे ज्यापद्धतीने त्याने साताऱ्यातील लोकांना अडचणीत आणले तसेच बिग बॉसमधील लोकांना देखील केसेसची धमकी देऊन तो अडचणीत आणू शकतो आणि मला देखील अडचणीत आणू शकतो असे ते म्हणाले. शेवटी तो पंतप्रधान असल्याचा मिश्किल टोला ही उदनराजेंनी लगावला.