SEBI : शेअर बाजारातील महत्त्वाचे नियम बदलणार, याचा गुंतवणूकदारांना फायदा काय? जाणून घ्या

 बाजार नियामक सेबीने एक मोठी घोषणा केली आहे.

Updated: Sep 8, 2021, 06:29 PM IST
SEBI : शेअर बाजारातील महत्त्वाचे नियम बदलणार, याचा गुंतवणूकदारांना फायदा काय? जाणून घ्या title=

मुंबई : बाजार नियामक सेबीने एक मोठी घोषणा केली आहे. सेबीने लवकरच T+1 (ट्रेड+1 दिवस) सेटलमेंट सायकल सुरू करणार आहे. याअंतर्गत आता शेअर्समधील व्यवहार एका दिवसातच निकाली निघतील. तथापि, ही सेटलमेंट योजना पर्यायी आहे. व्यापारी त्यांना हवे असल्यास ते निवडू शकतात. नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल.

काय आहे सध्याचा नियम?

सध्या, एप्रिल 2003 पासून देशात टी+2 सेटलमेंट सायकल लागू आहे. म्हणजेच, जेव्हा तुम्ही शेअर्स विकता, तेव्हा तो शेअर ताबडतोब ब्लॉक होतो आणि तुम्हाला व्यवसायीक दिवसाच्या दोन दिवसानंतर (T+2 दिवस) रक्कम मिळते. यापूर्वी देशात T+3 सेटलमेंट सायकल लागू होती.

काय आहे नवीन नियम?

सेबीच्या नवीन परिपत्रकानुसार, नवीन वर्षापासून, कोणताही स्टॉक एक्सचेंज सर्व शेअरधारकांसाठी कोणत्याही शेअरसाठी T+1 सेटलमेंट सायकल निवडू शकतो. सोप्या भाषेत बालायचे झाले, तर तुम्हाला शेअर विक्री केल्यानंतर एका व्यावसायीक दिवसानंतरच पैसे मिळतील. ही लहान सेटलमेंट सायकल अधिक सोयीस्कर असेल. हे करण्या मागचं कारण आहे की, असे केल्याने मार्केटमध्ये गती येईल.

लक्षात घ्या की, जर स्टॉक एक्स्चेंज कोणत्याही स्टॉकसाठी टी+1 सेटलमेंट सायकल निवडले, तर ते कमीतकमी सहा महिने चालू ठेवावे लागते. तसेच जर स्टॉक एक्सचेंज टी+2 सेटलमेंट सायकलची निवड करायची असल्यास, त्यासाठी एक महिना आधी नोटीस देणे आवश्यक आहे.

ऑगस्टमध्ये पॅनेलची स्थापना करण्यात आली

ऑगस्ट 2021 च्या सुरुवातीला, सेबीने यासाठी तज्ज्ञांचे एक पॅनेल तयार केले होते, जे T+2 ऐवजी T+1 सायकल लागू करण्याच्या प्रक्रियेतील अडचणींवर अहवाल सादर करणार होते. स्टॉक एक्सचेंज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि डिपॉझिटर्स यासारख्या मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सेबीने 85 कंपन्यांवर बंदी घातली

सेबीने सनराइज एशियन लिमिटेडसह 85 कंपन्या आणि व्यक्तींना शेअर बाजारात व्यापार करण्यास बंदी घातली आहे. या कंपन्यांना शेअर्सच्या किंमतीमध्ये फेरफार केल्याबद्दल एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. सनराइज एशियन आणि त्याच्या पाच संचालकांना भांडवली बाजारातून एक वर्षासाठी आणि 79 संस्थांना सहा महिन्यांसाठी शेअर बाजारात बंदी घालण्यात आली आहे.

यापूर्वी एका वेगळ्या आदेशात सेबीने कोरल हब लिमिटेडला भांडवली बाजारातून तीन वर्षांसाठी आणि सहा व्यक्तींवर दोन-तीन वर्षांसाठी बंदी घातली होती.