आलोक वर्मा यांची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करा - SC

 आलोक वर्मा यांची प्राथमिक चौकशी पुढच्या दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.

Updated: Oct 26, 2018, 09:30 PM IST
आलोक वर्मा यांची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करा - SC title=

नवी दिल्ली : सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची प्राथमिक चौकशी पुढच्या दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोगाला दिलेत. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या देखरेखीखाली ही चौकशी करण्यात येणार आहे. 

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या तीन सदस्यीय खंडपीठानं आज वर्मांच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी वर्मांच्यावतीने फली नरिमन यांनी दिल्ली पोलीस कायद्याचा हवाला देऊन सरकारच्या निर्णय आव्हान दिले होते. निर्णय लगेच रद्द करता येणार नाही, त्यासाठी चौकशीचा प्राथमिक अहवाल हाती आला पाहिजे, असे सरन्यायाधीशांनी नमूद केलेय.
 
केंद्रीय दक्षता आयोग सध्या आलोक वर्मा यांच्याविरोधात सीबीआयचेच विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी पत्राद्वारे केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत आहे. ही चौकशी १० दिवसात पूर्ण करावी असा निर्देश सरन्यायाधीशांनी दिला. पण त्यावर केंद्रीय दक्षता आयोगाचे वकील तुषार मेहता यांनी किमान तीन आठवड्याची मुदत मिळावी अशी विनंती केली. न्यायालायानं त्यांच्या विनंतीवर २ आठवड्यात वर्मांची प्राथमिक चौकशी पूर्ण करावी असा आदेश दिला. 

तिकडे आलोक वर्मांसोबतच सक्तीच्या रजेवर असलेले सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनीही त्यांच्याविषयी सरकारने घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. अस्थाना यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहे. अस्थाना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोईन कुरेशी नावाच्या एका बड्या मांस निर्यातदाराकडून सुमारे चार कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यावर अस्थानांही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. आज सर्वोच्च न्यायालयानं अस्थानांचं अपील ऐकून घेतलं. त्यावर केंद्र सरकारला उत्तर देण्यास सांगितलं.