तिकीट नाकारलं म्हणून माजी उपमुख्यमंत्री जमिनीवर लोळत रडले; लोकांनाही आवरेनात

तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा राजय्या (Thatikonda Rajaiah) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आल्यानंतर सर्वांसमोरच रडू लागले. भारत राष्ट्र समितीने (BRS) त्यांना तिकीट नाकारलं. त्यांचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 23, 2023, 02:30 PM IST
तिकीट नाकारलं म्हणून माजी उपमुख्यमंत्री जमिनीवर लोळत रडले; लोकांनाही आवरेनात title=

तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा राजय्या (Thatikonda Rajaiah) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आल्याने भावूक झाले आहेत. इतकंच नाही तर तिकीट नाकारलं म्हणून ते अक्षरश: धायमोकळून रडले. आपल्या समर्थकांसमोर ते खाली जमिनीवर पडून रडू लागले होते. भारत राष्ट्र समितीने (BRS) त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यास नकार दिला. त्यांचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

थातिकोंडा राजय्या हे घानपूर (स्टेशन) मतदारसंघातील विद्यमान आमदार आहे. मात्र असं असतानाही भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आणखी ज्येष्ठ नेते कडियाम श्रीहरी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.  तिकीट नाकारण्यात आल्यानंतर थातिकोंडा राजय्या आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचले होते. यादरम्यान समर्थकांनी 'जय राजय्या, जय तेलंगणा' अशा घोषणा दिल्या. यावेळी थातिकोंडा राजय्या भावूक झाले आणि समर्थकांसमोरच लहान मुलासारखं रडू लागले.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत राष्ट्र समितीच्या एका सरपंचाने काही महिन्यांपूर्वी थातिकोंडा राजय्या यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. 

सोमवारी के चंद्रशेखर राव यांनी 119 जागांपैकी 115 मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. तसंच स्वत: गजवेल आणि कामारेड्डी या दोन जागांवर निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याचं जाहीर केलं. तेलंगणात येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही.