रेल्वे स्टेशनवरील Sleeping चोर कॅमेरात कैद! चोरीची पद्धत पाहून पोलिसही थक्क; पाहा Video

The Sleeping Thief On Railway Station: रेल्वे स्थानकावर आतापर्यंत तुम्ही चोरी करुन पळणाऱ्या चोरासंदर्भातील बातम्या वाचल्या असतील किंवा व्हिडीओ पाहिले असतील. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडीओमध्ये चोरीची नवीन पद्धत उघडकीस आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 11, 2024, 09:23 AM IST
रेल्वे स्टेशनवरील Sleeping चोर कॅमेरात कैद! चोरीची पद्धत पाहून पोलिसही थक्क; पाहा Video title=
संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद

The Sleeping Thief On Railway Station: सामान्यपणे चोरी म्हटल्यानंतर नकळत एखाद्या व्यक्तीकडील वस्तू खेचून पळ काढणे असं गृहित धरलं जातं. मात्र उत्तर प्रदेशमधील रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक घटनाक्रम रेकॉर्ड झाला आहे. या व्हिडीओमध्ये मथुरा स्टेशनवर झोपून चोरी करणारा एक चोर कैद झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये मथुरा रेल्वे स्थानकामधील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं लक्षात आलं होतं. अनेकांनी चोरीच्या तक्रारी नोंदवल्यानंतर रेल्वे स्थानकातील प्रमुख पोलीस अधिकारी संदीप तोमर यांनी स्टेशनवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यामध्ये जे दिसून आलं ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला,

काय आहे या व्हिडीओमध्ये?

अनेक प्रवाशांनी त्यांचे फोन, मौल्यवान वस्तू आणि पाकिटं चोरीला गेल्याच्या तक्रारी मथुरा रेल्वे स्थानकातील जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या होत्या. या चोऱ्यांच्या घटनांचा माग कढण्यासाठी तपास सुरु करण्यात आला. त्यावेळेस स्थानकातील पॅसेंजर वेटिंग रुममध्ये काही प्रवासी जमिनीवरच झोपलेले दिसत आहे. सामान्यपणे रात्रीच्या वेळेस जे दृष्य वेटिंग रुममध्ये दिसेल असेच चित्र यात पाहायला मिळतं. मात्र अचानक झोपलेल्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती हलचाल करु लागते. ही व्यक्ती आजूबाजूला कोणी तिला पाहत तर नाही ना याची खात्री करुन घेते आणि बाजूला झोपलेल्या प्रवाश्याच्या दिशेने सरकते. ही व्यक्ती त्याच्या उजव्या बाजूला सरकते. आपला उजवा हात बाजूला झोपलेल्या प्रवाशाच्या खिशात टाकून त्याच्या खिशातील वस्तू बाहेर काढते. अनेकदा प्रयत्न करुनही हाती काही महत्त्वाचं लागत नसल्याने ही व्यक्ती वारंवार प्रयत्न करते आणि अखेर तिच्या हाती झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल फोन लागतो. 

आणि त्याने पळ काढला...

या प्रवाशाचा मोबाईल चोरल्यानंतर तशाच पद्धतीने झोपल्याचं सोंग आणत हा चोर दुसऱ्या प्रवाशाच्या दिशेने सरकतो. तिथेही तो आजूबाजूला आपल्याला कोणी पाहत तर नाही ना याची खात्री करुन पुन्हा चोरी करण्यास सज्ज होतो. दुसऱ्या प्रवाशाच्या खिशातून मोबाईल फोन बाहेर काढल्यानंतर तो जागेवरुन उठतो आणि डोक्याखाली उशाला घेतलेली बॅग घेऊन चालत वेटिंग रुमबाहेर पडतो. झोपेचं सोंग आणून चोरी करणाऱ्या या चोराने लढवलेली शक्कल पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

कोण आहे हा चोर?

तपासाअंती या चोराची ओळख पटली. रेल्वे पोलिसांनी या चोराला अटक केली आहे. अटक केलेल्या चोराचं नाव अवनिश सिंह असं असून तो 21 वर्षांचा आहे. तो इथा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेला एक मोबाईल फोन जप्त केला आहे. आतापर्यंत आपण अशाप्रकारे एकूण 5 मोबाईल चोरल्याची कबुली चोराने दिली आहे.