पाचव्या टप्प्यात ६२ टक्के मतदान; पश्चिम बंगालमध्ये पुन्हा भरभरून प्रतिसाद

पाचव्या टप्प्यात देशभरातील अनेक प्रतिष्ठित मतदारसंघांचा समावेश होता.

Updated: May 6, 2019, 08:47 PM IST
पाचव्या टप्प्यात ६२ टक्के मतदान; पश्चिम बंगालमध्ये पुन्हा भरभरून प्रतिसाद title=

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या देशभरातील ५१ मतदारसंघांमध्ये ६२.५६ टक्के इतके मतदान झाले. काही ठिकाणी हिंसा आणि ईव्हीएम यंत्र बिघडण्याचे प्रकार वगळता उर्वरित भागांमध्ये मतदान शांततेमध्ये पार पडले. उत्तर प्रदेशातील अमेठी, रायबरेली, लखनऊ या प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान झाले. तर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा सर्वाधिक मतदान झाले. मात्र, बराकपोर मतदारसंघातील हिंसेमुळे याला गालबोट लागले. याठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना हिंसेचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. त्यामुळे याठिकाणी पुन्हा मतदान घ्यावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. तर जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग मतदारसंघात येणाऱ्या एका मतदान केंद्राबाहेर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड फेकण्यात आला. मात्र, यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. जम्मू-काश्मीरमध्ये पाचव्या टप्प्यात १७.०७ टक्के मतदान झाले. तर झारखंडमध्ये ६४.५८, राजस्थानमध्ये ६३.७८, मध्य प्रदेशात ६३.४७ आणि उत्तर प्रदेशात ५७ टक्के मतदान झाले. 

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यांतील ५१ जागांसाठी एकूण ६७४ उमदेवार निवडणूक रिंगणात होते. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड आणि जम्मू-काश्मीर आदी राज्यांत आज सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. मध्यप्रदेशातील बैतूलमध्ये सर्वात कमी ३७.३७ टक्के मतदान झाले असून होशंगाबादमध्ये सर्वाधिक ६८.३८ टक्के मतदान झाले.