BJP ला मतदान करणं मुस्लिम महिलेला पडलं महागात, पतीने काढलं घराबाहेर, तलाकची धमकी

BJP ला मतदान का केलं, याचा जाब विचारत मुस्लिम महिलेला मारहाणही करण्यात आली

Updated: Mar 21, 2022, 07:03 PM IST
BJP ला मतदान करणं मुस्लिम महिलेला पडलं महागात, पतीने काढलं घराबाहेर, तलाकची धमकी title=

अजय कश्यप, झी मीडिया, बरेली : उत्तर प्रदेशातील (UP Election) बरेलीतून (Bareilly) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एका मुस्लिम महिलेला भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवाराला मतदान करणं चांगलंच महागात पडलं आहे. संतालेल्या पतीने या महिलेला घरातून हाकलून दिलं आहे. इतकंच नाही तर पतीने तिला तिहेरी तलाकची धमकीही दिली ​​आहे.

सासरच्यांनी केली जबर मारहाण
घरातून बाहेर काढण्यापूर्वी पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी महिलेला जबर मारहाणही केली. आपल्याला मारू नका अशी विनवणी ती आपल्या पतीकडे करत होती, पण तिचा पती इतका संतापला होता की त्याने तिच्या विनवणीकडे दुर्लक्ष केलं. पती आणि सासरच्या मंडळींनी केलेल्या अत्याचारानंतर आता या महिलेनं मदतीचं आवाहन केलं आहे.

लग्नाला झालं होतं एक वर्ष
पीडित महिलेचं लग्न तिच्या शेजारी राहणाऱ्या तय्यब अन्सारीसोबत गेल्या वर्षी झालं. तय्यब अन्सारीसोबत तिने प्रेमविवाह केला होता. ती बरेलीच्या बारादरी पोलीस स्टेशन परिसरातील एजाज नगर गोटिया इथली रहिवासी आहे. तिचे पती आणि सासरच्या मंडळींचा समाजवादी पक्षाला पाठिंबा आहे. पण महिलेने निवडणुकीत भाजपला मतदान केलं.

योगी सरकारच्या कामाने प्रभावित
पीडित मुस्लिम महिला योगी सरकारच्या (Yogi Government) कामाने चांगलीच प्रभावित होती. त्यामुळे भाजपाला मत दिल्याचं तिचं म्हणणं आहे. पण भाजपला दिलेले मत पती आणि सासरच्या मंडळींना आवडलं नाही. आता महिलेने मेरा हक फाऊंडेशनकडे मदत मागितली आहे.