लोकसभेत अर्थमंत्री म्हणाल्या, मी जास्त कांदे-लसूण खात नाही

निर्मला सीतारमण यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालंय

Updated: Dec 5, 2019, 12:35 PM IST
लोकसभेत अर्थमंत्री म्हणाल्या, मी जास्त कांदे-लसूण खात नाही title=

नवी दिल्ली : देशभर कांदे-लसणाच्या दरांनी नागरिकांच्या डोळ्यांतून पाणी काढलं असताना संसदेत मात्र एकमेकांना टोमणे मारताना खासदार दिसत आहेत. कांदे-लसणाचा वाढलेल्या भावांचा मुद्दा संसदेतही उपस्थित झाला. यावेळी बोलताना, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची 'चिंता करू नका... मी जास्त कांदे - लसूण खात नाही' असं म्हणतानाची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय. यावरून निर्मला सीतारमण यांना टीकेचं धनीही व्हावं लागलंय.

देशभरात कांद्याच्या किंमतींनी शंभरी कधीच ओलांडलीय. किरकोळ बाजारात १००-१२० रुपये किलो दरानं नागरिकांना विकत घ्यावा लागतोय. याच वाढलेल्या महागाईच्या मुद्यावर ४ डिसेंबर रोजी संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

यावेळी बोलत असताना निर्मला सीतारमण या आपलं म्हणणं मांडण्यासाठी संसदेत उभ्या राहिल्या. दरम्यान, एका विरोधक खासदारानं अर्थमंत्र्यांना टोमणा मारताना 'तुम्ही तर इजिप्शियन कांदे खात असाल' असा टोमणा मारला. यावर अर्थमंत्र्यांनी उत्तर दिलं 'चिंता करू नका मी जास्त कांदे - लसूण खात नाही. मी एका अशा कुटुंबातून येते जिथं कांद्याला जास्त महत्त्व दिलं जात नाही'. निर्मला सीतारमण यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालंय. लोकांनी सीतारमण यांना 'असंवेदनशील' म्हणत त्यांच्यावर टीका केलीय.

निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्यावर संसदेत मात्र एकच खसखस पिकली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी देशात कांद्याच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून उचलण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. 'शेतीचं क्षेत्रफळ घटल्यानं कांद्याच्या उत्पादनात घट झालीय. परंतु, उत्पादकांना प्रोत्साहीत करण्यासाठी सरकारकडून योग्य ती पावलं उचलण्यात येत आहे. कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी मूल्य स्थिरता कोषाचा (Price stability fund) वापर केला जातोय. यासाठीच ५७ हजार मॅट्रिक टनाचा बफर स्टॉक ठेवण्यात आलाय. याशिवाय इजिप्त आणि तुर्कस्तानातूनही कांदे आयात केले जात आहेत. महाराष्ट्र आणि राजस्थानच्या अलवरसारख्या क्षेत्रात इतर प्रदेशांतून कांदे पाठवण्यात येत आहेत' अशी माहिती सीतारमण यांनी दिली.