VIDEO : I Love You म्हणत वीरपत्नीने दिला शहीद पतीला अखेरचा निरोप

या धाडसाला म्हणावं तरी काय?

Updated: Feb 19, 2019, 01:11 PM IST
VIDEO : I Love You म्हणत वीरपत्नीने दिला शहीद पतीला अखेरचा निरोप  title=

देहरादून : सोमवारी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी लढा देत असताना भारतीय लष्कराच्या मेजर विभूती शंकर धोंडियाल यांना वीरमरण आलं. याशिवाय आणखी तीन जवानांनी या कारवाईत आपले प्राण गमावले. भारतमातेच्या या वीर सुपुत्रांच्या जाण्याने पुन्हा एकदा देश शोकसागरात बुडाला. मेजर धोंडियाल यांना मंगळवारी देहरादून येथे त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांचं दु:ख अनावर झालं होतं. पण, दु:खाच्या या प्रसंगात मेजर धोंडियाल यांची पत्नी मात्र काळजाचा दगड करुन उभी होती. 

अश्रूंना आवर घातलेला असतानाही त्यांच्या डोळ्यातून वाहणारं पाणी मनात होणारी घालमेल प्रतित करत होतं. एएनआय या वृत्तसंस्थेने मेजर धोंडियाल यांना अखेरची मानवंदना देतेवेळचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले. ज्यामध्ये त्यांची पत्नी निकिता कौल या मेजर धोंडियाल यांना अखेरला सलाम करत आहेत. त्यांच्या या धाडसाला म्हणावं तरी काय हाच प्रश्न पडतो. 

एएनआयवर या अंतिम मानवंदनेच्या एका व्हिडिओध्ये त्या शवपेटीत ठेवलेल्या आणि तिरंग्यातील मेजर धोंडियाल यांच्या पार्थिवाला एकटक न्याहाळताना दिसत आहेत. जणू कोणी प्रेमाची व्यक्ती गाढ झोपेत आहे आणि ती व्यक्ती आता हाक मारताच उठेल या आशेच्या नजरेने त्या न्यायाळत आहेत. फार काही न बोलता 'I Love You' हा अखेरचा संदेश त्यांनी आपल्या शहीद पतीला दिल्याचं व्हिडिओत दिसत आहे. ते कधीही परतणार नसल्याचं ठाऊक असतानाही वीरपत्नीचं हे धाडस अंगावर काटा आणून जात आहे. मेजर पुन्हा कधीच परतणार नाहीत, पण ते पराक्रमाने आणि आठवणींची सर्वांच्याच मनात कायम राहणार आहेत, अशीच भावना त्यांना मानवंदना देण्यासाठी आलेल्या जनसागराकडून व्यक्त करणयात आली.