कर्ज चुकवण्यासाठी विजय माल्या तयार, का तेही जाणून घ्या...

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारला माल्याला भारतात आणण्यात यश मिळालं तर ही मोदी सरकारसाठी जमेची बाजू असेल

Updated: Jun 28, 2018, 10:53 AM IST
कर्ज चुकवण्यासाठी विजय माल्या तयार, का तेही जाणून घ्या...  title=

मुंबई : सरकारी बँकांची तब्बल ९ हजार करोड रुपयांची उधारी थकवून परदेशात पळालेला विजय माल्या आता कर्ज चुकवण्यासाठी तयार असल्याच्या बाता मारतोय. मी बँकांकडून कर्ज घेऊन फरार झालेलो नाही तर संपत्ती विकून मी हे कर्ज फेडण्यासाठी तयार असल्याचा दावा विजय माल्यानं नुकताच केलाय. भारत सरकारलाच आव्हान देत फरार झालेला माल्या गेल्या दोन वर्षांपासून लंडनमध्ये मौज-मजेत आयुष्य जगतोय. परंतु, आत्ताच त्याला का सद्बुद्धी सुचलीय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हे नक्की जाणून घ्या... 

का सुचली माल्याला सद्बुद्धी?

उल्लेखनीय म्हणजे, माल्याला फरार घोषित करून त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी देण्यासंबंधी प्रकरणात ईडी कोर्टासमोर सुनावणी होण्यापूर्वी माल्या समोर येऊन कर्ज चुकवण्याची भाषा करू लागलाय. ईडी माल्याची १३,५०० करोड रुपयांची संपत्ती जप्त करण्याच्या प्रयत्नात आहे. माल्यावर मुख्य आरोप आहे तो फसवणुकीचा... पण, आता मात्र तो ही फसवणूक नसून आपल्याला व्यवसायात तोटा झाल्याचं प्रकरण असल्याचं सांगू लागलाय. आपण कर्ज परतफेडीसाठी प्रयत्न केल्याचंही तो आता सांगतोय. मिळालेल्या माहितीनुसार, माल्या आपली संपत्ती विकण्याच्या प्रयत्नातही आहे. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारला माल्याला भारतात आणण्यात यश मिळालं तर ही मोदी सरकारसाठी जमेची बाजू असेल. त्यामुळे माल्यानं अटकेचीही धास्ती घेतलीय. ब्रिटिश कोर्टानं प्रत्यापर्णाला मंजुरी दिली तरी काही अटींमुळे भारतीय सरकारचे हात बांधले जावेत, यासाठीही त्याचे प्रयत्न सुरू आहेत.

'कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय'

नऊ हजार कोटींचं कर्ज बुडवून परागंदा झालेल्या विजय मल्ल्यानं वेगळाच कांगावा सुरू केलाय. आपल्याला कर्जबुडव्यांचा "पोस्टर बॉय" बनवून टाकल्याचा त्याचा आरोप आहे. ब्रिटनमधल्या एका प्रसिध्द नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यानं हे आरोप केलेत. बॅकेच्या कर्जाची परतफेड करण्याचा आपण प्रयत्न केल्याचा दावाही मल्ल्यानं केलाय. माझं नाव घेताच लोकं भडकतात... हे सर्व राजकीय हेतूनं जाणूनबूजून केलं जात असल्याच्या उलट्या बोंबाही मल्ल्यानं मारल्यात. नऊ हजार कोटी रुपये द्यायची आपली तयारी आहे. तसंच सरकारी बँकांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं माल्ल्या म्हणाला आहे. 

१५ एप्रिल २०१५ साली मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेव्हाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहीलं होतं. पण त्यांच्याकडून आपल्याला कोणतंही उत्तर मिळालं नसल्याचा दावा माल्ल्यानं केला आहे. सीबीआय आणि ईडीनं मला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय हेतूनं मला अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप माल्ल्यानं केला आहे. कर्ज चुकवण्यासाठीच आपण दारुची कंपनी युनायटेड ब्रुअरीज होल्डिंग्स लि. (यीबीएचएल) आणि स्वत: कर्नाटक हायकोर्टात अर्ज देऊन यावर उपाय शोधण्याची मागणी केल्यांचही त्यानं म्हटलंय.

आपल्यावर ९ हजार करोड रुपयांच्या अफरातफरीचा आरोप होत असला तर आपण केवळ ५,५०० करोड रुपये घेतलेत, यातील १३०० करोड रुपये परत केल्याचंही माल्यानं म्हटलंय.