'प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच पाणीटंचाईने विमल राठोड यांचा बळी'

४५ फूट खोल विहिरीतून तळाला गाठलेले पाणी काढताना विमल राठोड ह्यांचा तोल गेला आणि त्या विहिरीत पडल्या.

Updated: Jun 11, 2019, 03:48 PM IST
'प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच पाणीटंचाईने विमल राठोड यांचा बळी'  title=

यवतमाळ : प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच पाणीटंचाईने विमल राठोड यांचा बळी घेतल्याचा आरोप करीत यवतमाळच्या महागाव तालुक्यातील माळेगाव येथे संतप्त गावकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. भीषण पाणीटंचाईने विमल राठोड या महिलेचा पाण्यासाठी ४५ फूट खोल विहीरीत पडून मृत्यू झाला. माळेगावला बाराही महिने पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गावलगतच असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या ४५ फूट खोल विहिरीतून तळाला गाठलेले पाणी काढताना विमल राठोड ह्यांचा तोल गेला आणि त्या विहिरीत पडल्या ज्यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

पाणीटंचाईसाठी भरमसाठ खर्च करून देखील उपाययोजना नियोजन शून्य असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. माळेगाव हे माळपठारावर वसलेले दोन हजार लोकसंख्येचे छोटेशे गाव आहे. शेती आणि शेतमजुरी करून जिवन जगणारी वस्ती आहे. पाणीटंचाई निवारणासाठी दरवर्षी चार खाजगी विहीरीचे अधिग्रहण केल्या जाते. पण त्या विहिरीला अपुरे पाणी असुन फक्त शासनाचा मोबदला लाटण्यासाठीच विहीरीचे अधिग्रहण केल्या जात आहे, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. 

गावामध्ये पाणी पुरवठ्याच्या तब्बल पाच विहीरी आहेत. पण एकाही विहिरीला पाणी उपलब्ध नसल्याने शिरपुर शिवारात पाणी पुरवठ्याची नविन विहीर खोदण्यात आली. त्या विहिरीचे पाणी गावातील विहीरीत टाकुन गावातील महीला व पुरूष ते पाणी काढण्यासाठी त्याठिकाणी एकच गर्दी करतात. मागील महिन्याभरापासून तांत्रिक आडचणीमुळे विहीरीत पाणी सोडण्यात आलेच नाही. अशा परिस्थितीत त्या विहिरीच्या तळाशी आसलेले पाणी काढण्यासाठी मृतक विमल राठोड गेली आसता ही दुर्दैवी घटना घडली.  त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून विमल राठोड यांचे प्रेत घेऊन चक्काजाम आंदोलन केले.