जागराला या या! राज्यातील धार्मिक स्थळं आजपासून भाविकांसाठी खुली

मंदिरात येताना ... 

Updated: Nov 16, 2020, 07:25 AM IST
जागराला या या! राज्यातील धार्मिक स्थळं आजपासून भाविकांसाठी खुली title=
जेजुरी

मुंबई : जवळपास सात ते आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर दिवाळी Diwali 2020 पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं पुन्हा खुली करण्याची परवानगी शासनातर्फे देण्यात आली आहे. मंदिरं खुली करण्याची परवानगी देण्यात आलेली असली तरीही कोरोनापासून बचावासाठी शक्य त्या सर्व परिंनी काळजी घेतली जाणार आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं खुली करण्याची घोषणा केल्यानंतर आता मंगल पर्वातच पुन्हा एकदा देवाच्या दारी जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार आहे. पण त्यासाठी मंदिरात येताना भाविकांनी मास्क लावणं, सोशल डिस्टनसिंग पालन करणं, आरोग्य सेतू ऍप वापरणं आवश्यक असून, कोरोनाच्या नियमांचं पूर्ण पालन करणं अशा अटी राज्य सरकारकडून लागू करण्यात आल्या आहेत.

लग्न झालेल्या जोडप्यांची दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता 

अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्येही आज म्हणजेच सोमवारपासून भाविकांसाठी दर्शन पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. मंदिरात भाविकांच्या गर्दीचा अंदाज बांधत प्रशासनानं नियमावली आखली आहे. 
जेजुरी गडामध्ये जाण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. ज्याअंतर्गत एका वेळी फक्त शंभर भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. गडामध्ये असणाऱ्या कासवावरून देवाच्या मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य दिंडी दरवाजात भाविकांचे तापमान तपासणी आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली असून पश्चिम दरवाजातून भाविकांना बाहेर सोडले जाणार आहे. 

लग्न झाल्यानंतर नवविवाहित जोडप्यानं खंडेरायाच्या दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. याच पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या काळात लग्न झालेल्या जोडप्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वस्तांकडून देण्यात आली आहे. 
दरम्यान, गडावरील पूजा-अभिषेक बंद राहणार असून देवाला प्रिय असणारा भंडाराही उधळता येणार नाही. भाविक, पुजारी आणि कर्मचाऱ्यांची देवस्थान न्यास पूर्ण काळजी घेणार आहे. 

कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर पूर्णवेळ खुलं नाही... 

राज्य शासनानं मंदिरं पुन्हा खुली करण्याची परवानगी दिली असली तरीही कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर पूर्णवेळ खुलं करता येणार नाही असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने स्पष्ट केलं आहे. काही वेळासाठी सकाळ आणि संध्याकाळ मंदिर खुलं असेल. शिवाय चार दरवाज्यांपैकी दोनच दरवाजे भक्तांसाठी खुले राहणार आहेत. रोज तीन ते साडेतीन हजार भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. 

दर्शनासाठी नियमावली आखण्यात आली आहे . मंदिराच्या आतमध्ये  रांगांची आखणी करण्यात येणार आहे.दर्शनाला मंदिरात जाण्यापूर्वी प्रत्येकाचे थर्मल टेस्टिंग केले जाणार आहे. नोंदणी करूनच मर्यादित चार हजार भक्तांना मंदिरात प्रवेश  दिला जाणार आहे. ऑनलाइन दर्शन व मर्यादित प्रवेश या वर मात्र पुजारी नाराज आहेत . 

 

शिर्डीत ग्रामस्थांना दर्शनासाठी प्राधान्य 

शिर्डी ग्रामस्थांना दर्शनासाठी प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर बाहेरून आलेल्या भक्तांना दर्शन दिलं जाईल. बाहेरून येणाऱ्या भाविकांना वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने आरती आणि दर्शन बुकींग करूनच दर्शन घेता येईल. सध्या दिवसभरात केवळ ६ हजार भाविकांनाच दर्शन मिळेल. साईभक्तांना गेटनंबर २ मधून प्रवेश दिला जाईल.