एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग, विरोधकांची टीका

 मागील 3 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार थकला आहे. 

Updated: Nov 9, 2020, 04:30 PM IST
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग, विरोधकांची टीका title=

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार एका तासात मिळणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. मागील 3 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाहीये. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. आधीच कमी पगार आणि तो ही मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीच्या 2 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. 

जळगाव आणि रत्नागिरीतील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. जळगाव येथील मनोज चौधरी यांनी मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कंटाळून आत्महत्या केली. यासाठी त्यांनी महामंडळ आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं पत्रात म्हटलं आहे. या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी जळगाव डेपो बंद करत निषेध केला. रत्नागिरी येथील पांडुरंग गदडे यांनी देखील गळफास घेऊऩ आपलं जीवन संपवलं. 

अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत एका महिन्याचा पगार लगेचच देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'एसटी कर्मचार्‍यांचे वेतन थकले आहे ही वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने एसटीची आर्थिक स्थिती बिघडल्याने वेतन थकले आहे. मी सांगितले होते दिवाळीपूर्वी वेतन देऊ. आजच एक महिन्याचे वेतन आणि सणाला जी अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय बैठकीत घेतला. अर्धा तासात एक महिन्याचे वेतन व अग्रीम रक्कम मिळेल. तीन महिन्याचे वेतन थकले आहे. आणखी एका महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न असेल, मग एका महिन्याचे वेतन शिल्लक राहिल.' 

'हताश होऊ, निराश होऊ नका आणि आत्महत्येचे पाऊल उचलू नका. ही परिस्थिती तात्पुरती आहे. एवढं टोकाचं पाऊल उचलू नका. यामुळे कुटुंबीय उघड्यावर येतात. एसटीची आर्थिक परिस्थीती बिकट आहे. सरकारकडून पैसे मिळण्यासाठी प्रस्ताव दिला आहे, बँकेकडे कर्जही घेण्यासाठीही प्रयत्न करतोय. एका तासात आज पैसे मिळतील.' असं देखील अनिल परब यांनी म्हटलं आहे.

याआधी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, 'वेतन न मिळाल्याने 2 एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या. हे अतिशय वेदनादायी, मनाला अस्वस्थ करणार्‍या घटना आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही 2 कुटुंब उघड्यावर आली आहेत.'

'आता तरी सरकारने जागे व्हावे. एसटी कर्मचार्‍यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत. जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणाऱ? आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का?' असं प्रश्न देखील फडणवीसांनी उपस्थित केला आहे.