कुणीही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना काहीही बोललं तर... अजित पवार यांचा मनोज जरांगे यांना इशारा

 Maratha Reservation : एक बामन मराठ्यांना संपवायला निघालाय, अशा शब्दांत जरांगेंनी फडणवीसांवर टीका केली. तर फडणवीसांनी कधीच जाती-पातीचं राजकारण केलं नाही असं उत्तर देत, चंद्रशेखर बावनकुळेंनी जरांगेंच्या वक्तव्याचा निषेध केला.   

वनिता कांबळे | Updated: Feb 25, 2024, 07:53 PM IST
कुणीही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना काहीही बोललं तर... अजित पवार यांचा मनोज जरांगे यांना इशारा title=

Ajit Pawar On Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत तिखट शब्दात हल्ला चढवलाय. मराठा समाजाला संपवण्याचं काम सुरू असून आपल्याला सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे म्हणूनच सलाईन घेणं बंद केलं असा आरोप करत मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलंय. सागर बंगल्यावर येतो आपल्याला मारून दाखवा असं आवाहनही मनोज जरांगेंनी दिलंय. जरांगेंनी फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या माणसामुळे कोर्टात आरक्षण टिकलं त्याच्याबाबत असं वक्तव्य खपवून घेणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. 

कुणीही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना काहीही बोललं तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगेंना दिलाय. तर जरांगेंच्या आंदोलनामागे कोण, हेही शोधणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. 

मनोज जरांगे सगेसोयरेंच्या अंमलबजावणीसाठी ठाम

मनोज जरांगे सगेसोयरेंच्या अंमलबजावणीसाठी ठामच आहेत. उद्यापासून रोज सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंतच रास्तारोको करा आणि त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवा असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केल आहे. बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होईल असा प्रकार करू नका, असंही जरांगेंनी म्हटलंय.

मनोज जरांगेंचा तोल सुटत चाललाय

मनोज जरांगेंचा तोल सुटत चाललाय, अशी टीका माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली. जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नये, असं नरेंद्र पाटील म्हणाले. 

मनोज जरांगेंच्या मागे कुणाची स्क्रिप्ट आहे? नितेश राणे

मनोज जरांगेंच्या मागे कुणाची स्क्रिप्ट आहे, ते शोधावं लागेल, अशी प्रतिक्रिया भाजप आमादर नितेश राणे यांनी दिली. तसंच जरांगेंनी सागर बंगल्यावर चाल करण्याची भाषा करू नये अशा इशाराही नितेश राणेंनी दिला. 
देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं बंद करा, असा इशारा भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगेंना दिला. जरांगे यांच्या मागे पवार आहेत की जालन्यातली भय्या फॅमिली, असा सवालही लाड यांनी केला. 
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे प्रामाणिकपणे मेहनत घेत आहेत, असं आमदार बच्चू कडू म्हणालेत. मात्र काही लोकांकडून आंदोलनाला वेगळं वळण लागावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जरांगेंनी अशा गोष्टींना बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केलं. जरांगेंनी आंदोलनाची दिशा बदलली तर चुकीचं होईल असंही कडूंनी सांगितलं.