१ एप्रिलला सोशल मीडियावर कोरोनाबाबत 'एप्रिल फूल' केल्यास जेलची हवा

 उद्या १ एप्रिल आहे. त्यानिमित्ताने  'एप्रिल फूल' कोणाला करु नका, अन्यथा जेलची हवा खावी लागेल. 

Updated: Mar 31, 2020, 09:05 AM IST
१ एप्रिलला सोशल मीडियावर कोरोनाबाबत 'एप्रिल फूल' केल्यास जेलची हवा  title=

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी कोरोना संकटाच्यानिमित्ताने लोकांना अफवा पसरवू नये, असे आवाहन केले आहे. उद्या १ एप्रिल आहे. त्यानिमित्ताने  'एप्रिल फूल' कोणाला करु नका, भीतीचे वातावरण तयार करु नका, अन्यथा जेलची हवा खावी लागेल. 

एक एप्रिल निमित्त नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज एप्रिल फुल बनवण्याकरता टाकले जाऊ शकतात, यात जमाव बंदी उठली आहे, सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे. अशा एप्रिल फूल साठी सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजवर कोणीही बळी पडू नये अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

 'एप्रिल फूल' केल्यामुळे प्रशासनाच्या तसेच लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जर अशा स्वरूपाचे मेसेज लोकांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास वायरल करणाऱ्या विरुद्ध तसेच त्या ग्रुप ॲडमिन विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी म्हटले आहे. तसे लिखित स्वरूपाचे पत्रक ही त्यानी काढले आहे.

देशा आणि राज्यावर कोरोना व्हायरसचे संकट आहे. लोकांना कोणीही घाबरविण्याचा किंवा त्यांची फसवणूक करु नका. विनाकारण प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि लोकांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे १ एप्रिलला  'एप्रिल फूल' न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.