राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा अपात्र, घरकुल घोटाळा भोवला

तुळजापूर नगर परिषदेत राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे.  

Updated: Jun 22, 2018, 10:16 PM IST
राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा अपात्र, घरकुल घोटाळा भोवला title=

उस्मानाबाद : तुळजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अर्चना गंगणे यांना अपात्र ठरविण्यात आलेय. त्यामुळे या नगरपरिषदेवर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांनी तीर्थक्षेत्र अनुदानात १ कोटी ६२ लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी आणि घरकुल घोटाळा प्रकरणामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.  

यात्रा अनुदान आणि घरकुल घोटाळाप्रकरणी नगराध्यक्ष अर्चना गंगणे यांच्यासह संबंधित आरोपी नगरसेवकांची पदे रद्द करून नगरपरिषद बरखास्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे १६ जून २०१७ रोजी केली होती. मात्र, त्या आपल्यावरील आरोप चुकीचे ठरवू शकल्या नाहीत.

 उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी  नगराध्यक्ष अर्चना गंगणे यांना अपात्र ठरविले आहे. नगराध्यक्षा गंगणे या १ कोटी ६१ लाख रुपयांच्या तुळजाभवानी यात्रा अनुदान घोटाळ्यासह घरकुल घोटाळ्यात मुख्य आरोपी होत्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गैरहजर होत्या. या कारणाने त्यांचे पद जिल्हाधिकारी गमे यांनी रद्द केले. 

तसेच या घोटाळ्यातील संबंधित आरोपी नगरसेवकांची नगरसेवक पदे रद्द करुन नगरपरिषद बरखास्त करून त्यावर प्रशासकाची नेमणूक करण्याची तक्रार तुळजापूर येथील समाजसेवक राजाभाऊ दिगंबर माने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे १६ जून २०१७ रोजी लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यावर याप्रकरणी तब्बल एक वर्ष सुनावणी झाल्यानंतर अखेर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गैरहजर राहिल्याने नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांचे नगराध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे.