पुण्यात कोणाचा उमेदवारी अर्ज मागे ? कोण बंडावर कायम ?

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीच पुण्यातील चित्र स्पष्ट झालंय.

Updated: Oct 7, 2019, 09:56 PM IST
पुण्यात कोणाचा उमेदवारी अर्ज मागे ? कोण बंडावर कायम ? title=

अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे :  उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीच पुण्यातील चित्र स्पष्ट झालंय. पुण्यातील निम्म्या मतदारसंघांत महायुती विरुद्ध आघाडी अशी थेट लढत होणार असून उर्वरित मतदारसंघांत तिरंगी, चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

वडगाव शेरी मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर संजय भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार, विद्यमान आमदार जगदीश मुळीक विरुद्ध शिवसेनेतून राष्ट्रवादीत घरवापसी केलेले उमेदवार सुनील टिंगरे यांच्यात लढत होणार आहे. 

या मतदारसंघात एमआयएम कडून डॅनियल लांडगे हेदेखील निवडणूक लढवत आहेत. कॅन्टोन्मेंट मतदार संघात काँग्रेसचे बंडखोर सदानंद शेट्टी, भाजपचे बंडखोर भरत वैरागे तसेच शिवसेनेच्या बंडखोर पल्लवी जावळे या तिघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या अधिकृत उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. याठिकाणी आता काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे विरुद्ध भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांच्यात सामना होणार आहे.

हडपसर मतदार संघात शिवसेना बंडखोर गंगाधर बधे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे इथं भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ठिकाणाहून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे निवडणूक लढताहेत. त्याचप्रमाणे महापालिकेतील नगरसेवक वसंत मोरे हेदेखील रिंगणात आहेत. त्यामुळे इथली लढत तिरंगी होणार आहे.

खडकवासला मतदारसंघात शिवसेना बंडखोर रमेश कोंडे यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपचे भीमराव तापकीर विरुद्ध राष्ट्रवादीचे सचिन दोडके यांच्यात थेट लढत होणार आहे भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत तर सचिन दोडके हे हे विद्यमान नगरसेवक आहेत.
पर्वती मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी बंडखोरी केली होती. मात्र आज त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. आता याठिकाणी भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका अश्विनी कदम यांच्यात थेट लढत होणार आहे.

कसबा मतदार संघात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कमल व्यवहारे यांनी माघार घेतली आहे. मात्र शिवसेनेचे बंडखोर विशाल धनवडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. याठिकाणी अरविंद शिंदे हे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर महापौर मुक्ता टिळक भाजपकडून लढत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना नगरसेवकाची बंडखोरी महायुतीच्या मुक्ता टिळक यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.

शिवाजीनगर मतदार संघ बंडखोरीची लागण होण्यापासून दूर दूर राहिलाय. या ठिकाणाहून भाजपन माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली आहे. यावरून पक्षात काही प्रमाणात धुसफूस निर्माण झाली होती. मात्र शिरोळे यांच्या विरोधात बंडखोरी टाळण्यात भाजपला यश आलं. त्यामुळे आता शिवाजीनगर मध्ये भाजपचे सिद्धार्थ शिरोळे विरुद्ध काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्तात्रय बहिरट यांच्यात थेट सामना होणार आहे.

सरतेशेवटी पुण्यातील सर्वात चर्चित असलेला मतदार संघ म्हणजे कोथरूड... याठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. त्या सगळ्यांनी मिळून माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे या दुरंगी लढतीकडे साऱ्यांच्याच लक्ष लागून राहणार आहे.

एकूण काय तर पुण्यातील लढतींच चित्र स्पष्ट झालंय. पुण्यात विधानसभेचे एकूण आठ मतदारसंघ आहेत गेल्या निवडणुकीत या आठही ही ठिकाणी भाजपचा झेंडा फडकला होता यावेळी पक्षीय समीकरणे बदलली आहेत त्याच प्रमाणे निम्म्याहून अधिक उमेदवार देखील बदलले आहेत अशा परिस्थितीत ही निवडणूक अतिशय उत्कंठावर्धक ठरणार आहे यात शंका नाही.