राणे म्हणाले, भाजपची शिस्त पाळणार!, सीएमचा सबुरीचा सल्ला

आक्रमकता हा स्थायीभाव असलेल्या नितेश राणेंना संयम शिकवू, असा टोला मुख्यमंत्र्यांनी मारला. 

Updated: Oct 15, 2019, 02:49 PM IST
राणे म्हणाले, भाजपची शिस्त पाळणार!, सीएमचा सबुरीचा सल्ला title=

सिंधुदुर्ग : कणकवली आज अखेर नारायण राणे यांचा मराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे आणि नीलेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नारायण राणे भाजपचेच खासदार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी भाजपची शिस्त पाळू, अशी ग्वाही राणेंनी दिली. तर आक्रमकता हा स्थायीभाव असलेल्या नितेश राणेंना संयम शिकवू, असा टोला मुख्यमंत्र्यांनी मारला. तसेच निवडणूक शांततेत लढा कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका, असा सबुरीचा सल्लाही नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांनी दिला. या संपूर्ण भाषणात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नावही घेतले नाही. 

राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन

राणेंचे कौतुक करताना देवेंद्र फडणवीस म्हणालेत, राज्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवला, आक्रमक पण अभ्यासू, महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व लाभले आहे. आजच्या दिवसाकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. आज नीलेश आणि संपूर्ण स्वाभीमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश झाला हे मी जाहीर करतो. हा प्रवेश मुंबईत करायचा ठरवले होते. मात्र भाजपच्या सिंधुदुर्गातील लोकांचे मत होतं हा प्रवेश कणकवलीत येऊन करावे. राणेंबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आक्रमक विरोधी पक्षनेते म्हणून त्याचे काम आम्ही जवळून बघितले आहे. काम करण्याऱ्या आमदारांना ते संधी द्यायचे. अर्थसंकल्पातील तज्ज्ञ म्हणून राणेंकडे पाहिलं जायचे. मला यात रस होता, त्यामुळे आमची नाळ जुळली. राणेंचे भरपूर प्रेम मिळाले.

 अनेक काम आपण कोकणात केली आहेत. चिपी विमानतळावरून लवकरच नियमित उड्डाणं सुरू होतील. सी वर्ल्ड हा एकच प्रकल्प राहिला आहे. येत्या दोन वर्षात सी वर्ल्डचे काम सुरू करून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला. राणेंचे इंजिन आणि आमचे इंजिन, अशी दोन इंजिन एकत्र आल्यानंतर गाडी सुसाट सुटेल. आपले सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक सिंधुदुर्गात घेतली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

आजच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर कोणतीही टीका केली नाही. नितेश राणे आक्रमकपणे विरोधी बाकावरुन कोकणचे प्रश्न मांडत होते. आता हे प्रश्न अधिक प्रमाणात सोडविण्यात मदत होईल. कारण आक्रमक राणे आता भाजपमध्ये आहेत. त्यांच्यासोबत मी काम केले आहे. ते विरोधी पक्षनेते होते त्यावेळीही काम करण्याची संधी मिळाली आहे. आता पुन्हा राणेंचे कुटूंब भाजपमध्ये आल्याने काम करण्याची संधी पुन्हा मिळाली आहे. त्यामुळे यापुढे कोकणचा विकास चांगला होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.