बाबरी पडताना नाव बदलून वाचवला होता जीव; नागपुरातल्या मुस्लिम कारसेवकाची कहाणी

नागपूरचे फारुख शेख 1992 मध्ये राम मंदिर आंदोलनात सहभागी होण्यासाठी अयोध्येला गेले होते. फारुख यांना 6 डिसेंबर 1992 रोजी रामजन्मभूमी आंदोलनात अटकही झाली होती. आता फारुख यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

अमर काणे | Updated: Jan 21, 2024, 03:12 PM IST
बाबरी पडताना नाव बदलून वाचवला होता जीव; नागपुरातल्या मुस्लिम कारसेवकाची कहाणी title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : अयोध्येतल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काही तासांचा अवधी उरला आहे. अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त हा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. देशभरात या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने देभरात राम मंदिरासाठी झटलेल्या कारसेवकांचादेखील सत्कार केला जात आहे. यावेळी अनेक कारसेवकांनी आपले अनुभव सांगितले आहेत.

नागपुरातील एका मुस्लिम कारसेवकानेही 1992 ला अयोध्येत कारसेवा केली होती..मोहम्मद फारुख शेख असे या कारसेवकाच नाव आहे. त्यावेळी फारुख शेख हे 14 वर्षांचे होते. नागपूरचे मोहम्मद फारुक शेख 1992 मध्ये कारसेवेसाठी अयोध्येला गेले होते. त्यावेळी अयोध्येत देशभरातून आलेल्या कार सेवकांना एक मुस्लिम मुलगा ही गर्दीत असल्याची माहिती कळल्यावर लोकं त्यांच्या जीवावर उठले होते. त्यांना जीवे मारण्यात येणार होते. मात्र त्या क्षणाला सोबतच्या हिंदू सहकारी कारसेवक डॉ. तुषार खानोरकर व डॉ. सुभाष राऊत यांनी प्रसंगावधान ठेऊन फारुख यांच्या डोक्यावर लगेच भगवी पट्टी बांधून हा मुलगा शिवा असल्याचे सांगितले. त्यामुळेच फारुख शेख यांचा जीव वाचला

नागपुरात परतल्यानंतर ही अनेक महिने मुस्लिम कारसेवक फारुख यांना त्यांच्या समाजातील लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. आता 22 जानेवारीला प्रत्येकाने आपापल्या घरी दिवे लावून राम उत्सव साजरा करा असे आवाहनही फारुख करत आहेत. फारुख यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसमवेत नागपूरच्या मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन वस्त्यांमध्ये पूजित अक्षताचे वाटप देखील केले आहे. फारुख यांनी स्वतः पुजलेल्या अक्षतचे भांडे हातात धरले होते. त्यांनी डोक्यावर भगवी टोपी घातली होती आणि जय श्री रामच्या घोषणा दिल्या.

अयोध्येत बांधलेले राम मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून ते राष्ट्र उभारणीचे मंदिर आहे, असे फारूख यांचे मत आहे. या मंदिराला धर्म, पंथ, जातीने बांधले जाऊ शकत नाही. हे मंदिर देशातील जातीय सलोख्याचे उदाहरण बनेल, असे फारुख यांना आशा आहे. फारुख सर्वांना घरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करत आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे निमंत्रण न मिळाल्याने थोडा दु:खी झालो होते, पण त्या दिवशी मी माझ्या घरी दिवा लावून जय रामचा जयघोष करीन असे फारुख यांनी सांगितले.

जेव्हा मशिदीचा ढाचा पाडण्यात आला तेव्हा मी त्यापासून काही अंतर दूर उभा होतो. पोलीस लाठीचार्ज करत होते. माझा साथीदार राजू गणराज जखमी झाला. त्यानंतर काही संघटना मुस्लिम तिथे आल्याचे समजले. मात्र कारसेवकांनी शिवप्रसाद साहू यांच्या नावाने माझे कार्ड बनवून मला शिव या नावाने हाक मारण्यास सुरुवात केली. या नावामुळे माझा जीव वाचला. या नावाखाली पोलिसांनी मला अटक करून फैजाबादला नेऊन नजरकैदेत ठेवले. त्यानंतर माझी नागपूरला रवानगी करण्यात आली, असे फारूख सांगतात.