रेल्वे स्थानकाबाहेरील गर्दी थोपवण्यासाठी भांडुपकरांची गांधीगीरी

शिस्तबद्ध भांडुपसाठी तरुणांची गांधीगीरी 

Updated: May 11, 2019, 12:50 PM IST
रेल्वे स्थानकाबाहेरील गर्दी थोपवण्यासाठी भांडुपकरांची गांधीगीरी title=

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या रेल्वे स्थानक आणि आजुबाजू्च्या परिसरात प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतंच चालली आहे. यावर तोडगा निघणं सध्या तरी कठीण वाटत आहे. भांडुप रेल्वे स्थानकाच्या बाहेरही रिक्षासाठी रोज गर्दी होत असते. नियोजन नसल्याने रोज गोंधळाचे वातावरण निर्माण होते. यावर पर्याय म्हणून भांडूपच्या सजग नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. पण नियोजन आणि शिस्त लावली तर ही गर्दी टाळता येऊ शकते हे भांडुपच्या सजग नागरिकांनी दाखवून दिले आहे. 

रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील वाढते वाद टाळण्यासाठी आणि जनतेचा प्रवास सुखकर होण्यासाठी भांडुपमधील काही तरुण पुढे सरसावले आहे.  शिस्तबद्द भांडूपसाठी सामाजिक क्षेत्रात काम करणारे तसेच राजकीय पक्षांमध्ये विविध पदांवर काम करणारे तरुण एकत्र आले आहेत. भांडूप स्थानकाजवळील रिक्षाचालक आणि इथल्या प्रवाशांना शिस्तबद्द रांगा लावण्याचे आवाहन करत आहेत. या कामात तरुणांना रिक्षा युनियनची देखील मदत होत आहे. यामुळे जनतेचा रिक्षा प्रवास सुखकर होण्यास मदत होत आहे. 

रेल्वे स्थानकातून मोठ्या संख्येने घरी आणि रिक्षा पकडण्यासाठठी बाहेर पडणारी गर्दी यांच्या समोर असते. एक रिक्षा पकडण्यासाठी अनेकजण धावतात. त्यात रिक्षाने भाडे नाकारल्यास त्यावरूनही वाद होत असत. या सर्वावर तोडगा काढण्यासाठी भांडूप स्थानकावर संध्यकाळी 6.30 वाजता सजग तरुण आणि तरुणी गोळा होतात. या गर्दीला विनंती करुन ते रांगेत उभे राहण्याचे आवाहन करतात. 

याआधी बराच वेळ रांगा लावून न मिळणारी रिक्षा आता मागील 3 दिवसांपासून 5 ते 10 मिनिटांत उपलब्ध होत आहे. असेच चित्र कायमस्वरूपी दिसावे यासाठी सजग तरुणांची धडपड सुरू आहे. या मोहिमेला रिक्षाचालक आणि सामान्य प्रवासी देखील सहकार्य करत आहेत.

चांगले विचार एकत्र आले कि त्यातून काही तरी चांगले सामाजिक कार्य होते याची प्रचिती भांडुपकर तरुणांचे हे समाजकार्य पाहुन येते. भांडुपकर तरुण करत असलेली गांधीगीरी मुंबईतल्या इतर स्थानकांवरही पाहायला मिळाली तर प्रवाशांची रोजच्या मानसिक त्रासातून मुक्तता होऊ शकते.