प्री-वेडिंग शूट झालं, पण त्यानंतर जे वाईट झालं ते कुठेच घडलं नाही

प्री-वेडिंग शूटनंतर जे घडलं, तसं कुणासोबतच घडू नये

Updated: May 27, 2022, 02:02 PM IST
प्री-वेडिंग शूट झालं, पण त्यानंतर जे वाईट झालं ते कुठेच घडलं नाही title=
संग्रहित फोटो

मयुर निकम, झी मीडिया, बुलडाणा : लग्नाआधी प्री-वेडिंग शूट करण्याचा ट्रेण्ड  सध्या सगळीकडेच आहे. लग्न ठरल्यानंतर पुढचा प्रत्येक क्षण आयुष्यभराची आठवण म्हणून रहावा यासाठी ही धडपड असते. यासाठी एकादा निसर्गरम्य देखावा, समुद्र किनारा किंवा एखादा किल्ला यांना पहिली पसंती दिली जाते.

बुलडाणातल्या चिखली तालुक्यातील एका तरुण आणि तरुणीनेही लग्नाआधी प्री वेडिंगचा प्लान आखला. यासाठी त्याने निसर्गाने नटलेल्या गोव्याची निवड केली. ठरलेल्या दिवशी गोव्याला गेले आणि प्री वेडिंग शूटही झालं. पण शुटच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचं लग्न मोडलं. असं नेमकं काय झालं याची चर्चा जिल्ह्यात सुरु झाली. 

नेमकं काय झालं?
चिखली तालुक्यातील एका गावातील 20 वर्षीय तरुणीचे तालुक्यातीच एका  25 वर्षीय तरुणाशी लग्न ठरलं. याच वर्षी दोघांचा साखरपुडा झाला. मुलगा  पुण्यात एका कंपनीत नोकरी करतो.  नोकरी करणाऱ्या नवऱ्या मुलाने आपल्या होणाऱ्या बायकोला मोबाईल देखील घेऊन दिला होता. 

दोघांनी 'कसमे वादे निभाएंगे हम' च्या आणाभाका घेतल्या. लग्न अविस्मरणीय व्हावं यासाठी दोघांनी प्री-वेडिंग शूट करण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी गोवाची निवड केली. ठरल्यानुसार तरुण तरुणी त्यांची मैत्रीण आणि दोन फोटोग्राफर असे एकूण पाच जणं गोव्याला पोहचले. समुद्रकिनारी छान फोटोग्राफी झाली. 

जेवण उरकून सर्वजण हॉटेलमध्ये आपापल्या रुममध्ये गेले. पण दुसरा दिवस उजाडला आणि तरुणाचा सूरच बदलला. मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही, मला जशी मुलगी हवी होती, तशी तू नाहीस' असं सांगत तरुणाने गोंधळ घातला. संतालेल्या तरुणाने मोबाईलही फोडला. 

अचानक घडलेल्या या प्रकाराने मुलगी घाबरली. कसेबसे ते परत आपल्या जिल्ह्यात पोहचले. लग्नाची सर्व तयारी झाल्यानंतर नवऱ्या मुलाने नकार दिल्याने मुलीकडचं कुटुंब हादरलं. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली नसून या प्रकरणावर सामाजिक स्थरावर तोडगा काढण्याचा प्रयत्न दोन्ही कुटुंबाकडून सुरू आहे.