मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा: बुलढाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटात एका 34 वर्षीय महिलेवर आठ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी 8 आरोपींविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. महिलेसोबत असलेल्या दिराच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणात पीडित महिलेऐवजी तिच्यासोबत असलेल्या दिराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र माझ्यावर कोणतही लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे त्या महिलेचं म्हणणं आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे आता या प्रकरणाला वेगळच वळण लागलं आहे.
घटनेची माहिती समोर आल्यानंतर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनमधे जाऊन पोलिसांनी तात्काळ बलात्काराचे गुन्हे दाखल करावे, आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणी केली होती.
याप्रकरणी महिलेच्यासोबत असलेल्या दिराचं म्हणणं आहे की तिच्यावर अत्याचार केला गेला. मात्र माझ्यावर अत्याचार झालाच नसल्याचं स्पष्टीकरण महिलेने दिलंय. त्यामुळे दोघांच्या वेगवेगळ्या जबाबामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिस आपल्या पद्धतीने तपास करत आहेत आणि लवकरच सत्य समोर येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी होणार का हा महत्वाचा प्रश्न आहे.कारण जर बलात्कार झालाच नाही तर सोबतच्या पुरुषाने बलात्काराची तक्रार का दिली? आणि पोलिसांनी महिलेला न विचारता थेट गुन्हा दाखल कसा काय आणि कुणाच्या दबावाखाली केला....? याची कुजबुज जनसामान्यत ऐकायला मिळतेय.
आपल्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नसून आम्ही दुपारी दोन वाजता देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून टेकडीवर बसलो. त्यानंतर तिथे काही तोंडाला रुमाल बांधलेले टवाळखोर आले त्यांनी माझ्या सोबतच्या पुरुषाला मारहाण करत पैसे आणि मोबाईल हिसकला आणि त्यांच्या मोबाईल मधे आमचे फोटो काढले आणि निघून गेले असा जबाब महिलेने पोलिसांना दिलाय याशिवाय अत्याचार झालेलाच नसल्याने माझ्या वैद्यकीय तपासणीचीही गरज नाही. असे या महिलेने म्हटलंय.
बुलढाणा हादरले! महिलेवर सामूहिक बलात्कार; 15 मिनिटांवर पोलीस ठाणे मात्र दोन तास पोलीस आलेच नाहीत
तरुण तरुणींनी निर्जनस्थळी जातांना विचार करणे गरजेचे आहे. बुलढाण्यातील राजूर घा नव्हे तर इतर निर्मनुष्य ठिकाणी बसलेल्या जोडप्याकडून मोबाईल आणि पैसे हिसकण्याचे प्रकार घडले आहेत मात्र भीतीपोटी कुणी तक्रार देत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे अशा ठिकाणी जातांना थोडा तरी विचार करा..!