'माझी ड्यूटी संपली' मोटरमनने मध्येच रेल्वे थांबवली... तब्बल तीन तास प्रवाशांचे हाल

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रेल्वे स्थानकावर तीन तास पॅसेंजर थांबवण्यात आली. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत स्टेअरिंग हातात घेणार नाही असं सांगत मोटरमनने रेल्वे थांबवून ठेवली. 

आशिष अंबाडे | Updated: Aug 21, 2023, 07:30 PM IST
'माझी ड्यूटी संपली' मोटरमनने मध्येच रेल्वे थांबवली... तब्बल तीन तास प्रवाशांचे हाल title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : लांबचा पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी भारतात रेल्वे प्रवासाला (Railway) जास्त पसंती दिली जाते. देशभरात रेल्वेचं प्रचंड मोठं जाळं असून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. या प्रवासात अनेक कडू-गोड अनुभव येत असतात. कधी बसण्याच्या जागेवरुन प्रवाशांमध्ये आपापसात भांडणं होतात. प्रकरण हाणामारीपर्यंत जातं. तर कधी चोरीचे प्रकार घडतात. पण याच रेल्वेत माणुसकीचं दर्शनही अनेकवेळा पाहिला मिळतं. एकमेकांच्या मदतीला लोकं धावून जातात. याच रेल्वेत प्रवासी एकत्र येत सणही साजरे करतात. असे अनेक किस्से आहेत. पण चंद्रपूरमधल्या रेल्वे प्रवाशांना एका वेगळ्याच अनुभावाला सामोरं जावं लागलं. 

विदर्भात गोंदिया-बल्लारपूर ही पॅसेंजर (gondia-ballarpur passenger) धावते. या पॅसेंजरमधील प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पॅसेंजर गोंदिया स्थानकातून (Gondia) सुटली, पण मूल स्थानकावर येताच रेल्वे थांबवण्यात आली. आधीच ही पॅसेंजर उशीराने धावत होती. त्यामुळे प्रवासी संतापलेले असतानाच मूल स्थानकात येऊन थांबली. बराच वेळ झाला तरी पॅसेंजर जागची हलली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटला त्यांनी याबाबत मोटरमनकडे विचारणा केली. पण मोटरमनने दिलेलं उत्तर ऐकून प्रवाशांच्या संतापाचा उद्रेकच झाला. मूल स्थानकावर येताच पॅसेंजरच्या मोटरमनने आपल्या ड्युटी संपल्याचं जाहीर केलं. 

मोटरमननचं उत्तर ऐकून प्रवशांना घाम फुटला. प्रवाशांनी रेल्वे चालवण्याची विनंती केली. पण मोटरमन आपल्या भूमिकेवर ठाम होता. लेखी आदेश आल्यानंतरच आपण स्टेअरिंग हाती घेऊ यावर मोटरमन अडून बसला. या दरम्यान प्रवासी आणि मोटरमन यांच्यात जोरदार वादावादी झाली. परिस्थइती बिघडत असल्याचं पाहून मूल इथल्या स्टेशन मास्तरांनी रेल्वेच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला. यात सर्वात तीन तास गोंदिया-बल्लारपूर पॅसेंजर मूल स्थानकावरच उभी होती. यामुळे संपूर्ण वेळापत्रक कोलमडून गेलं. त्याच्या मागच्या ट्रेनही खोळंबल्या होत्या. 

अखेर तीन तासांनंतर रेल्वेच्या मुख्या कार्यालतून मूल रेल्वे स्थानकावरच्या स्टेशन मास्तरला लेखी आदेश आला. त्यानंतर रेल्वे मूल स्तानकावरुन हलली आणि रात्री दीड वाजता चंद्रपूर स्टेशनवर पोहचली. चंद्रपूरात पोहचण्याची नियोजित वेळ ही रात्री साडेदहा वाजताची होती. मोटरमनच्या हट्टामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. तब्बल तीन ते चार तास प्रवाशांचे हाल झाले. गेले अनेक दिवसा पासून या मार्गावरील  पॅसेंजर गाड्या सतत उशीरा धावत असल्याने रेल्वे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे